टाटा रुग्णालय आणि आरोग्य विभागाची मोहीम

संदीप आचार्य, मुंबई</strong>

गेल्या काही वर्षांत देशासह राज्यात कर्करुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र कर्करोग योद्धय़ांनी (कॅन्सर वॉरियर) कंबर कसली असून, तब्बल २३०४ कर्करुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत.

परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालय आणि आरोग्य विभागाच्या सामंजस्य करारातून ‘कॅन्सर वॉरियर’ ही संकल्पना पुढे आली. यात नेमलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी गेल्या तीन वर्षांत जिल्हा रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत या शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच मोठय़ा प्रमाणात केमोथेरपी उपचारही करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

आरोग्य विभाग आणि टाटा कॅन्सर रुग्णालय यांच्यातील सामंजस्य करारानुसार २०१६ पासून ‘कॅन्सर वॉरियर’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने आरोग्य विभागाच्या २३ जिल्हा रुग्णालयांत, तसेच चार वैद्यकीय महाविद्यालयांत कॅन्सर रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक निर्माण करण्यात आले. यासाठी टाटा कॅन्सर रुग्णालयातून प्रशिक्षित झालेल्या व सामाजिक बांधिलकी असलेल्या डॉक्टरांचे सहकार्य घेतले असून ५९ कर्करोगतज्ज्ञांनी गावपातळीपर्यंत जाऊन काम करीत आहेत.

महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्सच्या डॉक्टरांनी जिल्हा पातळीवरील रुग्णालयात जाऊन गेल्या तीन वर्षांत ३०,०२६ रुग्णांची बाह्य़रुग्ण विभागात तपासणी केली, तर साडेसात हजार रुग्णांवर उपचार केले. तसेच २३०४ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्याचे राज्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयांप्रमाणेच सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद व सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतही कर्करुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, खासगी क्षेत्रातील कॅन्सरतज्ज्ञांना वॉरियर्सच्या पथकात सामील करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

सुविधांची कमतरता : नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीच्या अहवालानुसार, देशभरात दरवर्षी कॅन्सर रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून त्या तुलनेत उपचाराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. टाटा कॅन्सर रुग्णालय आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून देशभरातील विविध राज्यांमध्ये ‘कर्करुग्ण उपचार सेतू’ उभारण्याचे काम सुरू आहे. टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या राज्यांतील डॉक्टरांना कॅन्सर शस्त्रक्रियांसह उपचारासाठी प्रशिक्षित करत आहेत. तसेच आवश्यक ती मदत उपलब्ध करून देत आहेत.

जागृतीचा अभाव : क र्करोगाविषयी समाजात पुरेशी जागृती नसल्यामुळे बऱ्याचदा लक्षणे दिसूनही रुग्ण उपचार घेण्याचे टाळतात व शेवटच्या टप्प्यात उपचाराकडे वळतात. ही गोष्ट लक्षात घेऊन कर्करोग पहिल्या टप्प्यात लक्षात येऊन उपचाराला सुरुवात करण्यावर आरोग्य विभागाने प्राधान्य दिले आहे. यासाठी यंदा राज्यव्यापी कॅन्सर तपासणी मोहीम राबविण्यात आल्याचेही डॉ. तायडे यांनी सांगितले.