22 April 2019

News Flash

उद्योगसमूहांची ‘राजनीती’ राजकीय पक्षांच्या मुळावर?

एका उद्योग समुहाने स्थानिक निवडणुकीत स्वत:चे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणले आहे.

एर्नाकुलम जिल्ह्य़ातील किझाहक्कबलम ग्रामपंचायत निवडणुकीत किटेक्स उद्योग समुहाने पुरस्कृत केलेले १९ पैकी १७ उमेदवार निवडून आले आहेत.

केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘प्रयोगाला’ यश; विकासासाठी लढल्याचा कंपनीचा दावा
आतापर्यंत धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील संस्था, महिलांच्या संघटना निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याकरिता मदत करीत असत. पण एका उद्योग समुहाने स्थानिक निवडणुकीत स्वत:चे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणले आहे. केरळमध्ये यशस्वी झालेल्या या प्रयोगाचा कित्ता इतर बडय़ा उद्योग समुहांनी गिरविल्यास तो धोकादायक पायंडा पडू शकतो, तसेच राजकीय पक्षांकरिता धोक्याचा इशारा आहे.
केरळमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत एर्नाकुलम जिल्ह्य़ातील किझाहक्कबलम ग्रामपंचायत निवडणुकीत किटेक्स उद्योग समुहाने पुरस्कृत केलेले १९ पैकी १७ उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय या परिसरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही याच पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली. कपडे तयार करणाऱ्या या उद्योग समुहाने सामाजिक बांधिलकी उपक्रमाच्या अंतर्गत ‘व्टेन्टी-२०’ पॅनेलमधून उमेदवार उभे केले होते. कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या भागातील निवडणुकीत उमेदवारांना सारी मदत करण्यात आली. विशेष म्हणजे १९ पैकी १७ जागांवर या समुहाने पुरस्कृत केलेले उमेदवार मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले आहेत.
कंपनीच्या कार्यक्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशानेच स्थानिक ग्रामपंचायतीवर नियंत्रण असावे ही कंपनीची भावना होती व त्यातूनच निवडणूक लढविण्यात आल्याचे केटेक्स उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सॅबू जेकब यांचे म्हणणे आहे.
आपले हित किंवा स्वार्थ साधण्याकरिता स्थानिक निवडणुकांमध्ये निधी ओतून स्वत:चे उमेदवार निवडून आणायचे आणि ते निवडून आल्यावर कंपनीला हवे तसे निर्णय घेण्यास भाग पाडायचे, असा प्रकार होऊ शकतो.
पूर्वी उद्योगपती निवडणुकांमध्ये आपल्या जवळच्या उमेदवारांना मदत करीत असत. नंतर उद्योगपतीच निवडणुकीच्या रिंगणात उतरले. अनिल अंबानी, विजय मल्यासह काही बडय़ा उद्योगपतींनी राज्यसभेत प्रवेश केला होता.
प्रयोगाची पुनरावृत्ती शक्य?
केरळमधील हा प्रयोग राजकीय पक्षांना सूचक इशारा आहे. कंपनीने निवडणूक जिंकलेल्या पंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अडवणूक अथवा कंपनीच्या कलाने जाण्यास विरोध केल्याने केटेक्स उद्योग समूहाने स्वत:चे उमेदवार उभे केले असण्याची शक्यता आहे. या प्रयोगाचा कित्ता अन्य उद्योग समूहांकडून राबविला जाण्याची शक्यता भविष्यात नाकारता येणार नाही.
केरळमधील ग्रामपंचायत निवडणुकीत उद्योगसमूहाने प्रायोजित केलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचा फलक.

First Published on November 10, 2015 5:10 am

Web Title: candidates won in kerala panchayat elections sponsored by industries
टॅग Industries