पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपट पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये रिंगण, हलाल आणि वक्रतुंड महाकाय या तीन चित्रपटांचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी ही माहिती दिली.
या चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी झी चित्रगौरव सोहळा, राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा यासाठी काम केलेल्या नामवंत परीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या तीन चित्रपटांपैकी एखाद्या चित्रपटाच्या सहभागाबाबत काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून अजून ‘द सायलेन्स’ याही चित्रपटाची निवड समितीने करून ठेवली आहे.
वरील तीन चित्रपटांचे कान येथे इंडस्ट्रियल स्क्रिनिंगच्या माध्यमातून १६ ते १८ मे या काळात प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण ६ खेळ होणार आहेत. दर्जेदार मराठी चित्रपटांना सातासमुद्रापार नेणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांना त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर अस्तित्व सिद्ध करण्याची सुवर्णसंधी निर्माण करून देणे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे तावडे यांनी सांगितले.