भांडवलशाहीविरोधात सशस्त्र क्रांतीची भाषा करणाऱ्या नक्षलवाद्यांनी आता दलित चळवळीत बस्तान बसविण्यासाठी दलित अत्याचार आणि दलित नेत्यांचा कथित संधिसाधूपणा या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. एकीकडे दलित अत्याचारांचे भांडवल करीत दलित तरुणांना माओवादी विचारसरणीशी जोडायचे आणि त्यानिमित्ताने दलित नेत्यांना समाजापुढे उघडे पाडायचे, अशी ही खेळी आहे. माओवादी संघटनेच्या डावपेच आणि व्यूहरचनेविषयी तयार करण्यात आलेल्या दस्तावेजात याची सविस्तर माहिती देण्यात आली असून, माओवाद्यांच्या पुस्तिकेवरून नक्षलवादविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाने हा दस्तावेज तयार केला आहे.  
राज्यातील दलितांवरील वाढते अत्याचार आणि त्याविरोधातील आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जातीयवाद आणि त्यावर आधारित होणाऱ्या शोषणाच्या विरोधात उघड व छुप्या मार्गाने दलित चळवळीशी जोडून घेण्याची व आपला विस्तार वाढविण्याची नक्षलवाद्यांची ही खेळी आहे. त्याकरिता दलित किंवा आंबेडकरवादी चळवळींना त्यांनी आपले लक्ष्य केले आहे. दलितांवरील अत्याचाराचे भांडवल करा, त्याविरोधात लढा, प्रस्थापित स्वार्थी दलित नेत्यांना उघडे पाडा, दलित चळवळीशी जोडून घ्या आणि आपला कार्यभाग साधून घ्या, असा त्यांचा डाव आहे. दलितांवर, आदिवासींवर अत्याचार झाला की, त्याचा निषेध करण्यासाठी डाव्या संघटना सक्रिय होतात. केंद्र व राज्य सरकारने अलीकडेच नक्षलग्रस्त जिल्ह्य़ांचे डावी-कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हे असे नामांतर केले आहे, ही बाबही यादृष्टीने लक्षणीय ठरते.
मुस्लिमांचीही सहानुभूती..
दलितांबरोबरच हिंदुत्ववादी राजकारणामुळे कायम असुरक्षितेची भीती बाळगणाऱ्या मुस्लीम समाजाचीही सहानुभूती मिळवण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील गरीब, नाडलेला वर्ग, विद्यार्थी, बेरोजगार, शिक्षक, साहित्यिक, बुद्धिवंत यांच्या नावाने वेगवेगळ्या छुप्या संघटना बांधणे व त्या माध्यमातून माओवादी विचाराची भूमी विस्तारणे हा त्यांच्या व्यूहनीतीचा भाग असल्याचे दिसते.
निळ्या विद्रोहावर लाल क्रांतीचे सावट
निळ्या विद्रोहाचा वारसा चालविणाऱ्या दलित तरुणांची सहानुभूती मिळवण्याचा माओवादी किंवा नक्षलवाद्यांचा प्रयत्न असतोच, परंतु आता दलितांवरील वाढत्या अत्याचाराचे भांडवल करून त्याविरोधातील आंदोलनात सहभागी होऊन माओवादाचा विस्तार करण्याचे डावपेच आखले जात आहेत.  २००४ मध्ये नव्या स्वरूपात संघटित झालेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाने गेल्या पाच-सहा वर्षांपासून शोषणाविरुद्ध लढणाऱ्या समूहांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात त्यांनी देशात १७ टक्के लोकसंख्या असलेल्या आणि लढाऊ बाणा असलेल्या दलित समाजावर, त्यांच्या चळवळीवर, त्यांतील कार्यकर्त्यांवर नजर ठेवली आहे. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्यात वेगवेगळ्या नावाने सहभागी होणे, हा त्यांच्या व्यूहरचनेचाच एक भाग असल्याचे पोलिसांकडून प्राप्त झालेल्या दस्तावेजातील मांडणीवरून दिसते. क्रांतीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या नावांनी संघटना स्थापन करण्याचे माओवाद्यांचे प्रयत्न आहेत. खास करून महिला, साहित्यिक व युवकांच्या संघटनांची बांधणी करण्यावर त्यांचे विशेष लक्ष आहे. मात्र जातीच्या नावाने संघटना स्थापन करण्यापासून दूर राहावे, अशी त्यांची रणनीती आहे. दलितांच्या प्रश्नांचे भांडवल करून आपला स्वार्थ साधणाऱ्या दलित नेत्यांना वेगवेगळ्या पद्धतीने उघडे पाडले पाहिजे. जेणे करून दलित नेतृत्वाबद्दल नफरत निर्माण होईल व आपल्या विचारांबद्दल सहानुभूती निर्माण होईल, असाही त्यांचा प्रयत्न आहे. दलितांवरील अत्याचार, िहसाचाराच्या विरोधात आपल्या स्वत:च्या संघटनांच्या वतीने आंदोलने उभी करणे, हाही त्यांच्या व्यूहरचनेचा भाग आहे. दुसऱ्या बाजूला अन्याय-अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या अन्य दलित संघटनांशी हातमिळवणी करून त्यांच्याबरोबर विविध मुद्दय़ांवर वैचारिक संवाद सुरू ठेवणे, दलितांचे प्रश्न, त्यांच्यावरील अत्याचार, संधिसाधू नेतृत्व, यावर सातत्याने आंदोलनातून, वैचारिक वादविवादातून मारा करीत क्रांतिकारी विचारांचा पाया विस्तारण्याची माओवाद्यांची नवी खेळी पोलिसांनी पुढे आणली आहे. आंबेडकरी चळवळीतून व डाव्या चळवळीतून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.