वाहनांची देखभाल करून घेण्याचे आवाहन

मुंबई : दोन दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील उषा किरण इमारतीजवळ एका चारचाकी गाडीला लागलेली आग ही गाडीच्या विजेच्या तारेमधील बिघाडामुळे लागली असल्याचे स्पष्ट झाले आहे. टाळेबंदीच्या काळात अनेकांच्या चारचाकी गाडय़ा एकाच जागी असल्यामुळे गाडय़ांचा वापर करण्यापूर्वी त्यांची देखभाल करून घ्यावी, असे आवाहन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

शनिवारी उषा किरण इमारतीच्या जवळ उभ्या असलेल्या एका गाडीला संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आग लागली. या आगीत संपूर्ण गाडीने पेट घेतला होता. इंजिनच्या भागात ही आग भडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग तीन फायर इंजिन आणि एक जम्बो टँकरच्या मदतीने विझवली. मात्र ही आग नक्की कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन अधिकारी करत होते. सॅनिटायझरच्या बाटलीमुळे आग लागली का, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र गाडीत सॅनिटायझर नव्हते, अशी कबुली गाडीच्या मालकाने दिली होती. गाडी पार्किंग मध्ये उभी करत असताना इंजिन बंद करताच गाडीने पेट घेतला.

गाडीच्या विजेच्या तारेमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे ही आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे टाळेबंदीनंतर गाडीची देखभाल करून मगच गाडी वापरावी.

– प्रभात रहांगदळे, अग्निशमन दलप्रमुख