घाटकोपरमध्ये गृहसंकुलातील जुन्या विहिरीचा स्लॅब खचला

मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील एका खासगी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील विहिरीवरील सिमेंट काँक्रीटचा स्लॅब कोसळल्यामुळे त्यावर उभी असलेली चारचाकी मोटार विहिरीत बुडाली.  या दुर्घटनेत कोणीही जखमी  झाल्याचे वृत्त नाही.

मोटार बुडत असल्याची ध्वनीचित्रफित रविवारी समाज माध्यमांवरून प्रसारित झाली. ही चित्रफित पाहून खड्डय़ात गाडी बुडत असल्याचे समजून अनेकांनी पालिकेवर टीका सुरू केली. मात्र या घटनेशी पालिके चा संबंध नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

घाटकोपर पश्चिमेकडील नौरोजी मार्ग येथील रामनिवास या जुन्या रहिवासी संस्थेत शनिवारी सकाळी ही घटना घडली. या संस्थेच्या आवारात एक विहिर आहे. विहिरीच्या अध्र्या भागावर ‘आरसीसी’ करून ती झाकण्यात आली होती. त्यावर  रहिवासी मोटारी उभ्या करीत असत. हा भाग खचून त्यावर उभी असलेली मोटार पाण्यात बुडाली.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उपसा पंपाने विहिरीतील पाण्याचा उपसा केला. त्यानंतर क्रे नच्या मदतीने मोटार वर काढण्याचे प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. तसेच विहिरीच्या आजूबाजूला  सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाय योजना तातडीने करण्याच्या सूचना संस्थेला देण्यात आल्या आहेत.

विहिरीत बुडालेली मोटार तेथील रहिवासी डॉ. किरण दोषी यांची आहे.  शनिवारी सकाळी साडे आठ वाजता ही घटना घडली. ‘‘माझी गाडी अचानक जमिनीत  गाडली जात असल्याचे एका व्यक्तीने पाहिले. त्याने आरडोओरडा के ला. आम्ही  खाली येईपर्यंत गाडी विहिरीत गाडली गेली’’, असे डॉ. दोषी यांनी सांगितले. ही विहीर शंभर वर्षे जुनी असून सुमारे ५० -६० वर्षांपूर्वी स्लॅब टाकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.