ठाणे शहरातील मॉलमध्ये खरेदी करून मुंबईला घरी परत असताना रस्ता चुकलेल्या विनय लांबा या तरुणाच्या कारने ठाणे स्थानक परिसरातील सुमारे २५ ते ३० रिक्षांना धडक दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यामध्ये एकजण जखमी झाला असून त्याचे नाव समजू शकलेले नाही. या घटनेनंतर चिंतामणी चौकातून अल्मेडा मार्गे पळत असताना वाहतूक पोलिसांनी त्याला पकडले. या तरुणाला वाहतूक पोलिसांनी ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
मुंबईतील चेंबूर भागात राहणारा विनय लांबा (२१) हा बीएमएमचा विद्यार्थी असून तो मैत्रिणीसोबत ठाणे शहरातील एका बडय़ा मॉलमध्ये खरेदीसाठी आला होता. खरेदी आटपून तो कारने पुन्हा घरी जाण्यास निघाला. मात्र, रस्ता चुकल्याने त्याने ठाणे स्थानक परिसरात कार नेली. त्या वेळी त्याने सुमारे २५ ते ३० रिक्षांना धडक दिली. तसेच कार अडविणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार चढविण्याचा प्रयत्न केला. याशिवाय पादचाऱ्यांनाही त्याने धडक दिली असून सुदैवाने पादचारी किरकोळ जखमी झाले आहेत.