बहुतांश गॅरेज बंद; सुटे भाग मिळत नसल्याने पंचाईत

मुंबई : राज्य सरकारने कठोर र्निबधांच्या काळात वाहनदुरुस्ती व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी अधिकृत कंपन्यांची गॅरेज वगळता मुंबईतील बहुतांश गॅरेजगल्ल्यांना टाळे लागले आहे.  अशा ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता स्थानिक प्रशासनाकडून र्निबध घालण्यात आले आहेत. याचा मोठा फटका गाडय़ांच्या चालक-मालकांना बसत आहे. घराजवळची गॅरेज बंद असल्याने गाडय़ा दुरुस्तीसाठी अनेकांना वणवण करावी लागतआहे.

सध्या लोकल आणि बसमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे अनेक जण आपल्या खासगी वाहनांनी ये-जा करीत आहेत. अशा वेळी वाहन पंक्चर होणे, बॅटरी खराब होणे किंवा अन्य बिघाडाचे प्रकार होतात. मात्र हे बिघाड दुरुस्त करणारी दुकानेच सध्या बंद आहेत. जी काही दुकाने खुली असतात तेथे वाहनाचे आवश्यक सुटे भाग मिळत नसल्याने पंचाईत होते. वाहनाचे सुटे भाग विक्री करणारी दुकाने र्निबधांमुळे बंदच आहेत. मुंबईतील बहुतांश गॅरेज वाहनांच्या सुटय़ा भागांच्या दुकानांच्या आसपास असतात. अशा ठिकाणी नागरिकांचा राबता असतो. ही दुकाने सुरू ठेवण्यास  सरकारने परवानगी दिलेली नाही आणि गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून रस्त्यांवरील गॅरेज बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे मोठय़ा कंपन्यांचे सेवा के ंद्र गाठणे हा एकमेव पर्याय उरला आहे. ‘मोठय़ा कंपन्यांच्या सेवा के ंद्रांमध्ये गाडी दुरुस्त करणे खर्चीक ठरते. म्हणूनच छोटी गॅरेज कधी सुरू होणार याची वाट पाहत आहोत,’ असे जीटीबी नगर येथील गॅरेज गल्लीत गाडी दुरुस्तीसाठी आलेल्या एकाने सांगितले. माहीम, धारावी, प्रतीक्षानगर, वडाळा, परळ, कुर्ला येथील गॅरेजमध्ये दररोज लोक चौकशीसाठी येत आहेत. परंतु गॅरेज बंद असल्याने नाइलाजाने घरी परतावे लागते. गॅरेज मालकासोबत ओळख असणारी मंडळी मोबाइलवरून संपर्क साधून एखाद्या गल्लीत उभे राहून गाडीची दुरुस्ती करून घेत आहेत. तर काहींनी दुकानाबाहेर संपर्क क्रमांक लावला आहे.

वाहनतंत्रज्ञांची कोंडी

गाडय़ांच्या सुटय़ा भागांची दुकाने बंद असल्याचा ग्ॉरेज मालकांनाही फटका बसला आहे. दुकाने बंद असल्याने गाडय़ांचे सुटे भाग किंवा आवश्यक साहित्य मिळणे कठीण झाले आहे. तेही साहित्य आडमार्गाने गॅरेजमध्ये आणून ठेवावे लागत आहे. ‘गॅरेज आणि सुटय़ा भागांची दुकाने एकमेकांवर अवलंबून आहेत. दुकाने बंद असल्याने दुरुस्तीसाठी वाहनांचे सुटे भाग मिळत नाहीत. गाडय़ांची दुरुस्ती गरजेची असल्याने सुटय़ा भागांची दुकाने आणि गॅरेज सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी,’ अशी मागणी गॅरेजचालकांकडून करण्यात येत आहे.