मद्यपान करून वाहन चालवून दोघांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या जान्हवी गडकर या महिला वकिलाने प्रमाणापेक्षा चौपट मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड झाले आहे. मरीन ड्राइव्ह येथील पंचतारांकित हॉटेलातून मद्यपान करून बाहेर आल्यानंतर रात्री पुन्हा ती काळाघोडा येथील आयरिश पबमध्ये मद्यापान करायला गेल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. दरम्यान, जान्हवीची २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मद्यापान करून पूर्व मुक्त मार्गावर चुकीच्या मार्गिकेतून भरधाव गाडी नेत एका टॅक्सीला धडक देणाऱ्या जान्हवीने मरीन ड्राइव्ह येथील एका पंचतारांकित हॉटेलात केवळ सहा पेग व्हिस्की घेतल्याचे पोलिसांनी सांगितले होते. हे हॉटेल रात्री दहा वाजता सोडल्याचा दावा तिने गेला होता. अपघात रात्री १ वाजून १० मिनिटांनी घडला होता. त्यांनतरच्या तीन तासात ती कुठे होती त्याचा पोलीस तपास करत होती. काळाघोडाच्या आयरिश पबमध्ये ती गेल्याचे पुरावे शुक्रवारी पोलिसांना सापडले. पोलिसांनी पबमधील कर्मचाऱ्यांची जबानी घेतली आहे. ती पबमध्ये तब्बल दीड तास बसली होती, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. हेच कर्मचारी जान्हवीच्या प्रकरणातील महत्वाचे साक्षीदार ठरणार आहेत. या पबमध्ये जान्हवीला पाहणाऱ्या एका इंग्रजी बिझनेस वर्तमानपत्राच्या महिला पत्रकाराचीही पोलीस जबानी घेण्याची शक्यता आहे. या पबमध्ये तिने आणखी मद्यपान केल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे मरीन ड्राईव्हवर दोन तास गाणी ऐकत असल्याचे जान्हवीच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.
जान्हवीच्या रक्तात चौपट मद्य
न्यायवैद्यक प्रयोगशाळेने पोलिसांना सादर केलेल्या अहवालात जान्हवीने निर्धारित प्रमाणापेक्षा चौपट मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले आहे. १०० मिलिलिटर रक्तात ३० मिलिग्रॅम अल्कोहोल असण्यास मान्यता आहे. मात्र, जान्हवीच्या रक्तात हेच प्रमाण १२० मिलीग्रॅम एवढे आढळले आहे.