मुंबईत मागील तीन-चार दिवस मुसळधार पाऊस झाला. संततधार पावसाने मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी झालं असून, अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईतील घाटकोपर परिसरात घडली. रविवारी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेस नेते संजय निरुमप यांनी मुंबई महापालिका आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला. पीआरमधून (स्वतःची प्रसिद्धी) वेळ मिळाल्यास याकडेही लक्ष द्या, अशा शब्दात निरुमप यांनी सुनावलं आहे.

मान्सूनने पाऊल ठेवताच पावसाने मुंबईत कहर केला. सलग तीन ते चार दिवस पावसाची संततधार सुरू होती. पहिल्याच पावसाने मुंबईकरांची चांगलीच फजिती केली. मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं. तर अनेक घरात पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी असं दृश्य निर्माण झालं होतं. शनिवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मुंबईकरांना दिलासा मिळाला.

हेही वाचा- दहा दिवसांतच महिन्याभराचा पाऊस; ९ जूनला मुंबई उपनगरात २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस

पावसाने ब्रेक घेतल्यानंतर रविवारी दुपारी एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. घाटकोपर पश्चिममधील कामा लेन येथील त्रिभुवन मिठाईवाला दुकानाच्या पाठीमागे रामनिवास या जुन्या सोसायटीतील विहिरीवर सोसायटीने आरसीसी करून अर्धी विहीर झाकली होती व त्यावर सोसायटीतील रहिवाशी वाहनं पार्क करीत असत. या विहिरीवरील आरसीसी पावसामुळे खचली. यावेळी इथे पार्क करण्यात आलेली पंकज मेहता यांची कार विहिरीत बुडाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण आश्चर्यव्यक्त करत आहेत.

याच घटनेवरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुंबई महापालिका आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. निरुपम घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आणि “अद्भूत! मुंबईतील घाटकोपर परिसरात हळूहळू बुडत असलेली कार… मुंबईतील नागरी सुविधा कशा पद्धतीने रसातळाला चालल्या आहेत, याचंच हे एक उदाहरण आहे. बृहन्मुंबई महापालिकेनं प्रसिद्धीतून वेळ मिळाल्यास याकडेही लक्ष द्यावं,” असा टोला निरुपम यांनी लगावला आहे.

मुंबईत पाऊस कमी, तरीही रस्ते पाण्यात

मुंबईत शनिवारी तुलनेने कमी पाऊस होऊनही अनेक भागांत पाणी तुंबले आणि मुंबईचा वेग मंदावला. रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. तर दादर, शीव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पाणी तुंबल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पहाटेपासून सुरू असलेली मुसळधार आणि दुपारी समुद्रास आलेली भरती यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने मुंबईकरांचे हाल झाले.