12 December 2019

News Flash

हृदय शल्यविशारद डॉ.अन्वय मुळे यांचे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे शतक!

डॉ. मुळे यांनी मुंबईत पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली ती ३ ऑगस्ट २०१५ रोजी.

डॉ. अन्वय मुळे

संदीप आचार्य, मुंबई

भारतासारख्या विकसनशील देशात हृदय प्रत्यारोपणासह इतर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी करणे हे  मोठे आव्हानच. मात्र, ते लीलया पेलत मुलुंडच्या फोर्टिज रुग्णालयातील विख्यात हृदय शल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी  प्रत्यारोपणाच्या शंभर शस्त्रक्रिया मंगळवारी पूर्ण केल्या. त्यात ९८ हृदय प्रत्यारोपण तर दोन फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

गेल्या दोन दशकांपासून डॉ. मुळे भारतात हृदय शस्त्रक्रिया करीत असून त्यांनी आजपर्यंत तब्बल चार हजारांहून अधिक यशस्वी बायपास शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉ. मुळे यांनी मुंबईत पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली ती ३ ऑगस्ट २०१५ रोजी. त्याआधी  केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, ती यशस्वी ठरली नाही. फोर्टिज रुग्णालयात झालेल्या पहिल्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पुण्यातील एका रुग्णालयात ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाचे हृदय मिळाले.  तेव्हापासून गेल्या चार वर्षांत डॉ. मुळे यांनी हृदय प्रत्यारोपणाच्या ९८ शस्त्रक्रिया केल्या असून त्यात हृदय व फुप्फुस प्रत्यारोपणाच्या एकत्रित अशा पाच शस्त्रक्रियांचा समावेश आहे. याशिवाय दोन शस्त्रक्रिया या फुप्फुस प्रत्यारोपणाच्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील डॉ. बर्नाड यांनी १९६७ मध्ये हृदय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया केली होती. भारताचा विचार केल्यास ‘एम्स’मध्ये विख्यात हृदय शल्यविशारद डॉ. पी. वेणुगोपाळ यांनी १९९४ मध्ये पहिली हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. त्यांनी एकूण हृदय प्रत्यारोपणाच्या २६ शस्त्रक्रि या केल्या होत्या.

या पाश्र्वभूमीवर डॉ. मुळे यांनी दोन फुप्फुस प्रत्यारोपण व  ९८ हृदय प्रत्यारोपणासह तब्बल शंभर यशस्वी शस्त्रक्रिया करून एक नवा विक्रम केला आहे.

या हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांमध्ये तीन वर्षांच्या एका मुलीचा समावेश आहे. या चिमुरडीला अवघ्या दीड वर्षांच्या लहानग्याचे हृदय बसविण्यात आले. डॉ. मुळे यांनी एकूण १७ लहान मुलांच्या हदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.  त्यांनी मंगळवारी मुंबईत एका १६ वर्षांच्या मुलावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.

भारतातील रुग्णांसाठी अशा शस्त्रक्रियांची मोठय़ा प्रमाणात गरज आहे. त्यासाठी अवयवदान चळवळ रुजणे आणि वाढणे गरजेचे आहे.- डॉ. अन्वय मुळे

First Published on June 20, 2019 1:28 am

Web Title: cardiac surgeon dr anvay mulay complete implant surgery century
Just Now!
X