News Flash

‘व्हिवा लाउंज’मध्ये जाणून घ्या करिअरची यशसूत्रे

संरक्षण दलांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच संरक्षणमंत्र्यांनी नुकतेच केले.

| July 27, 2015 06:43 am

संरक्षण दलांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच संरक्षणमंत्र्यांनी नुकतेच केले. या पाश्र्वभूमीवर संरक्षण क्षेत्रातील संधीच्या वाटा शोधण्याची, या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीशी संवाद साधण्याची संधी ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिली आहे. तसेच भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये मुलींचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत आहे, यातील करिअरच्या संधीही खुणावत आहेत. एकूणच या दोन्ही क्षेत्रांचा आवाका, अधिकार, या क्षेत्रांत येण्यासाठी लागणारी शैक्षणिक तयारी यांची माहिती करून घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे, ‘व्हिवा लाउंज’च्या माध्यमातून! संरक्षण आणि प्रशासकीय सेवा या दोन्ही क्षेत्रांत उत्तुंग स्थान गाठणाऱ्या अनुक्रमे सोनल द्रविड आणि अश्विनी भिडे यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी ‘व्हिवा लाउंज’च्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. मंगळवारी, २८ जुलै रोजी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे.
आपापल्या क्षेत्रात स्वतच्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या कर्तबगार महिलांच्या यशोगाथा ‘व्हिवा लाउंज’च्या माध्यमातून सादर झाल्या आहेत. यावेळच्या रौप्यमहोत्सवी ‘व्हिवा लाउंज’च्या व्यासपीठावर प्रथमच नौदलातील महिला अधिकारी कमांडर सोनल द्रविड येत आहेत. कमांडर द्रविड नौदलाच्या शैक्षणिक विभागात वरिष्ठ अधिकारी पदावर आहेत. कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी संरक्षण दलात जाण्याचा निर्णय घेतला. कमी वयातच नौदल शिक्षण विभागाच्या उपसंचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली.
सनदी अधिकाऱ्यांच्या लाल दिव्याच्या गाडीचेही अनेकांना आकर्षण असते. पण त्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतात, कशी तयारी करावी लागते, याबरोबरच काम करतानाचे अनुभव अश्विनी भिडे सांगतील. अश्विनी भिडे सध्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी गेली दोन दशके सनदी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेपासून मंत्रालयापर्यंत विविध विभागांमध्ये काम केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये त्या भारतातून पहिल्या आल्या होत्या. २००८ ते २०१४ दरम्यान भिडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कार्यरत होत्या. या काळात मुंबईच्या विकासाचे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प त्यांनी तडीस नेले. या दोघींशी संवाद साधायची, त्यांचा प्रवास जाणून घ्यायची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे. ‘झी २४ तास’ हे या कार्यक्रमाचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत.

सर्वोत्कृष्ट टि्वट भेटवस्तू
तुमच्या मते कर्तबगार स्त्रीची व्याख्या काय, हे ‘टि्वटर’च्या माध्यमातून आम्हाला कळवा. यासाठी www.twitter.com/LoksattaLive या लोकसत्ताच्या टि्वटर हँडलवरून #LSVivaLounge25 हा हॅशटॅग वापरून टि्वट करा. सर्वोत्कृष्ट टि्वट करणाऱ्यांना मंगळवारी होणाऱ्या व्हिवा लाउंजच्या कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 6:43 am

Web Title: career tells from viva ladies
टॅग : Viva
Next Stories
1 घराबाहेरील सुरक्षेत वाढ
2 पोलिसांनी हात आखडता घेतल्याने खबरीही दुरावले!
3 विधान परिषदेत विधेयके रखडल्यास घटनेतील तरतुदीच्या आधारे मंजुरी
Just Now!
X