सल्लागारांकडून लवकरच अंतिम अहवाल; खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत कमी दर

राज्यात प्रवासी वाहतूक सेवा देणारे एसटी महामंडळ उत्पन्नवाढीसाठी लवकरच मालवाहतूक सेवाही पुरवणार आहे. ही सेवा देण्यासाठी जुन्या बस गाडय़ांचा वापर केला जाणार आहे. मालवाहतूक सेवा व्यवहार्य आहे की नाही यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली असून लवकरच अहवलाही सादर केला जाईल, अशी माहिती महामंडळाने दिली. विशेषत: शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल या दृष्टीनेच त्याची आखणी केली जात आहे.

एसटी महामंडळ सध्या १८ हजार बस गाडय़ांमार्फत प्रवासी सुविधा देत आहेत. यात वातानुकूलित सेवेचाही समावेश आहे. याचबरोबर महामंडळाची पार्सल सुविधाही सुरू आहे.

यानंतर उत्पन्नवाढीसाठी महामंडळाने मालवाहतूक सेवाही देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या प्रकल्पाचा विचार होतानाच काही महिन्यांपूर्वी सल्लागाराची नियुक्ती केली. सल्लागाराने नुकतेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मालवाहतूक प्रकल्पाचे सादरीकरणाही केले. परंतु त्यात आणखी काही बदल करून अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. ही सेवा कितपत फायदेशीर ठरेल, या सेवेसाठी लागणारी जागा, बसगाडय़ा, राज्यातील कोणत्या भागात सर्वाधिक होणारी मालवाहतूक इत्यादी माहिती घेतानाच ती व्यवहार्य ठरेल का ते सल्लागाराकडून तपासले जात आहे.

यासाठी एक स्वतंत्र यंत्रणादेखिल उभारली जाईल. तसेच एसटीच्या जुन्या बस गाडय़ांचा वापर मालवाहतुकीसाठी केला जाणार आहे. बस गाडय़ांची कालमर्यादा दोन ते तीन वर्षे संपण्याआधीच त्यांची बांधणी ट्रक, टेम्पो पद्धतीने केली जाईल. वेळप्रसंगी नवीन ट्रकही खरेदी करण्याची तयारी एसटी महामंडळाने दर्शविली आहे. मालवाहतूक सेवा देताना खासकरून राज्यातील शेतकऱ्यांना ही सेवा कशी फायदेशीर ठरेल त्या दृष्टीने त्याची आखणी केली जाईल. त्यासाठीच खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत कमी दर आकारले जाणार आहेत.

मालवाहतूक सेवेत लवकरच एसटी पाऊल ठेवणार आहे. परंतु त्याआधी ही सेवा महामंडळासाठी व्यवहार्य आहे का ते तपासले जात आहे. यासाठी सल्लागारही नियुक्त करण्यात आला आहे. मोठी वाहतूक करतानाच खासकरून शहरी ते ग्रामिण भागातील मालवाहतुकीला प्राधान्य दिले जाईल.           – रणजीत सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

  • एसटी महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार बस गाडय़ा आहेत.
  • आणखी पाच ते सहा हजार बस राज्यातील आगारांत उभ्या करण्याची क्षमता आहे का तेदेखील तपासले जात आहे.
  • मालवाहतुकीसाठी जास्तीत जास्त एसटी गाडय़ांचाच वापर करण्याचा प्रयत्न असणार आहे.