आजच्या बंदमध्ये ९० लाख वाहनांचा सहभाग

केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेला जीएसटी, डिझेल दरवाढ अशा काही धोरणांविरोधात देशभरातील मालवाहतूकदारांनी ९ आणि १० ऑक्टोबर असे दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय झाला आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशन या देशव्यापी संघटनेने संपाची हाक दिली असून त्याला बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. या संपात देशभरातील ९० लाख मालवाहतूक वाहने सामील होतील. तर यामध्ये राज्यातील दोन लाख वाहनांचा समावेश असेल. यात दूध व भाज्यांची वाहतूक करणारे वाहने सामील नसतील, अशी माहिती बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून देण्यात आली आहे. तरीही ज्यांना संपात सामील होण्याची इच्छा होत असेल ते होऊ शकतात, असे स्पष्ट केल्याने दूध व भाज्यांची वाहतूक करणारे वाहने सामील होणार की नाही याबाबत मात्र संभ्रम आहे.

यासंदर्भात बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे प्रवक्ते महेंद्र आर्य यांनी सांगितले की, मुळातच आमच्याबद्दल सरकारचे असलेले धोरण हे चुकीचे असल्याचे दाखवून द्यायचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने डिझेलच्या किमती वाढत असून त्या कमी होत नाहीत. त्याचप्रमाणे जीएसटीमधील धोरणांचा परिणाम मालवाहतुकीवर होत असून व्यापारी मालमत्तेच्या विक्रीवरही जीएसटी आकारला जात आहे. त्याचा फटका मालवाहतूकदारांना बसतो. महामार्गावरून मालवाहतूक करताना आरटीओच्या चाललेल्या मनमानी कारभाराचाही त्रास सहन करावा लागतो. त्याला विरोध करण्यासाठीच देशव्यापी संप पुकारण्यात आला असून त्याला आमच्या असोसिएशननेही पाठिंबा दर्शविला आहे. ९ ऑक्टोबरला संप सुरू होऊन १० ऑक्टोबरच्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तो सुरू राहील, अशी माहिती त्यांनी दिली. देशभरातील ९० लाख मालवाहतूक वाहने यात सामील होतानाच महाराष्ट्राबाहेरून येणारी सव्वा लाख वाहनेदेखील असतील. तर महाराष्ट्रातच धावणारी साधारण दोन लाख वाहनेही यात सामील होतील.