हक्काच्या वाहनसौख्याच्या कल्पना आर्थिक अडचणींमुळे पूर्णत्वास आल्या नसतील, तर त्यांच्यासाठी खरेदीपोषक वातावरण तयार झाले आहे. मारुती, ह्य़ुंदाई या प्रवासी वाहनांपासून ते थेट हीरो, होन्डा या दुचाकी निर्माती कंपन्यांनीही त्यांच्या वाहनांमध्ये कमालीची किंमत कपात लागू केली आहे. यंदाच्या हंगामी अर्थसंकल्पात केवळ चार महिन्यांसाठी वाहनांवरील अबकारी करावरील सवलत जाहीर करण्यात आली असली तरी वाहन उत्पादक कंपन्यांनी मात्र त्याचा लाभ आतापासूनच देण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या वर्षांत दशकातील सुमार विक्रीची नोंद करणाऱ्या वाहन उद्योगासाठी ४ मीटरपेक्षा कमी आकाराच्या प्रवासी कारवर ८ टक्के, मध्यम
व मोठय़ा आकाराच्या प्रवासी कारवर अनुक्रमे २० व २४ टक्के, स्कूटर-मोटरसायकल व व्यापारी वाहनांवर २४ टक्के व स्पोर्ट यूटिलिटी वाहनांवर २४ टक्क्यांपर्यंत अबकारी कर आणून अर्थमंत्र्यांनी तमाम वाहन खरेदीदारांना अप्रत्यक्षरित्या स्वस्ताईची भेटच दिली आहे.

स्वस्तकारण!
सतत घसरत राहिलेल्या वाहन विक्रीच्या आकडय़ांना सावरण्यासाठी वाहनांवरील अबकारी कर कमी करण्याची मागणी या उद्योगातून गेल्या अनेक महिन्यांपासून होत होती. त्याची पूर्तता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दुचाकीसह प्रवासी, व्यापारी तसेच स्पोर्ट यूनिलिटी वाहनांवरील अबकारी कर २ ते ७ टक्क्यांपर्यंत कमी करून केली. याचा परिणाम वाहनांच्या किंमती थेट १,५०० ते दीड लाख रुपयांपर्यंत कमी होत आहेत.