ठाणे महापालिकेतील अधिकारी, बिल्डर आणि वास्तुविशारदाच्या अभद्र युतीकडून सर्वसामान्य ग्राहक कसा नाडला जातो याचे ठसठशीत उदाहरण कळव्यातील एका प्रकरणात पुढे आले असून करारपत्रात नमूद असलेल्या जागेपेक्षा कमी आकाराची घरे दिल्याप्रकरणी ठाण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद प्रवीण जाधव याच्यासह बिल्डर विवेक मंगला यांच्याविरोधात तसेच त्यांना साथ दिल्यावरून पालिका नगररचना विभागातील अधिकाऱ्यांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
ठाण्यातील मोठमोठय़ा गृहसंकुलांचे वास्तुविशारद असलेले प्रवीण जाधव हे महापालिकेच्या नगररचना विभागात बडी असामी म्हणून ओळखले जातात. मोठय़ा प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचा सहभाग असल्याने महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांची खास ऊठबस असते, असेही सांगण्यात येते. कळवा येथील दत्तवाडी परिसरातील ‘अप्पर क्रस्ट’ इमारतीमधील रहिवाशांच्या फसवणुकीप्रकरणी थेट जाधव यांचे नाव पुढे आल्यामुळे महापालिकेतील नगररचना विभागातील अधिकारीही हादरले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘अप्पर क्रस्ट’ या गृहसंकुलातील ४० घरांचा ताबा २०११ मध्ये रहिवाशांना देण्यात आला. बिल्डरने करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे घरे आपल्या पदरात पडतील, असा विश्वास असल्याने रहिवाशांनी घरांचा ताबा घेतला खरा, मात्र प्रत्यक्षात ही घरे २० ते ८५ चौरस फुटांनी कमी असल्याचे त्यांच्या लगेचच लक्षात आले. या प्रकरणी सुरुवातीला येथील रहिवाशांनी बिल्डर तसेच वास्तुविशारदकाकडे पाठपुरावा केला. मात्र या दोघांनीही दाद दिली नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या गृहसंकुलात राहणारे सिद्धार्थ द्विवेदी, सुनील िशदे, दीपक साळुंखे यांच्यासह आणखी सहा रहिवाशांनी मात्र या प्रकरणी आवाज उठविण्याचे ठरविले. अधिक शोध घेतला असता बिल्डरने घरांचे क्षेत्रफळ कमी करून उरलेले चटईक्षेत्र शेजारीच उभ्या राहात असलेल्या व्यावसायिक इमारतीसाठी वापरल्याची माहिती या रहिवाशांना मिळाली.
वास्तुविशारद प्रवीण जाधव आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिल्डर विवेक मंगला यांनी हे उद्योग केल्याची तक्रार या रहिवाशांनी कळवा पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी प्राथमिक तपास केल्यानंतर पोलिसांनी प्रवीण जाधवसह बिल्डर विवेक मंगला आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
ठाण्यात महापालिका आणि बिल्डर लॉबीची अभद्र युती दिवसेंदिवस घट्ट होत आहे. विकासकांना झुकते माप देणारे निर्णय वेगाने होत आहेत. हरित पट्टय़ातले टीडीआर वाढवणे, कोपरीतील जलद वाहतूक प्रकल्पासाठीच्या आरक्षित भूखंडात फेरफार करणे, एफएसआय वाढवून देणे, अशा गोष्टी उघडकीस येत आहेत.

संपर्क टाळणारा जनसंपर्क!
’या प्रकरणी ठाणे महालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही, तर जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनीही उशिरापर्यंत दूरध्वनी उचलला नाही. ’या घटनेमुळे नगररचना विभागातील सावळागोंधळ उघडकीस आल्यामुळे दुपारनंतर या विभागात शुकशुकाट पसरल्याचे चित्र होते. प्रवीण जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा विषय या विभागातील काही अधिकाऱ्यांकडे काढताच ‘तेवढे सोडून काय ते बोला’, अशा प्रतिक्रिया येत होत्या.

रहिवाशांनी एका खासगी वास्तुविशारदाची नेमणूक करून घरांच्या क्षेत्रफळाची मोजणी केली आहे. त्यातील सत्यता तपासण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करून नव्याने घरांच्या आकारमानाची मोजणी केली जाईल. ठोस पुरावे हाती आल्यावर दोषींवर कारवाई केली जाईल.
वरिष्ठ अधिकारी, कळवा पोलीस ठाणे