उल्हासनगर महापालिका हद्दीतील काही मालमत्ताधारकांना जुन्या दराने कर आकारणी करणे तर काहींना वाढीव दराने कराची आकारणी करुन मालमत्ता कर विभागात घोटाळा केल्याच्या आरोपावरुन महापालिकेतील पाच माजी उपायुक्तांविरोधात बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका खासगी कंपनीच्या तब्बल सात कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वावर महापालिकेचे सुमारे चार कोटी ४४ लाखाचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
संजय दुसाने (सध्या पदावर, साहाय्यक संचालक नगरपालिका प्रशासन, नाशिक), मिलिंद सावंत (प्रकल्प अधिकारी, नाशिक), अशोक बागेश्वर (संचालक, नगरपरिषद संचालनालय, वरळी), पी. डी. कोळेकर (निवृत्त), हरेश इदनानी (उप मुख्य लेखाधिकारी, उल्हासनगर) अशी या पाच अधिकाऱ्यांची नावे असून कॉम्प्युटर एडस कंपनीचे अमर रेड्डी तसेच त्यांच्या कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. २०१० मध्ये उल्हासनगर महापालिकेतील मालमत्ता विभागाचे लेखापरिक्षण करण्यात आले होते. लेखापरिक्षणातून काढण्यात आलेल्या आक्षेपांची शासनाच्या परवानगीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यावेळी २००२-२००३ तसेच २००८-२००९ या कालावधीत मालमत्ता विभागात उपायुक्त म्हणून काम करणाऱ्या पाच उपायुक्तांनी पदाचा दुरूपयोग करून मालमत्ता कर विभागात बरेच घोळ घालून ठेवल्याचे सकृतदर्शनी उघड झाले आहे.