मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील ‘विभागीय रेल्वे अधिकारी’ इमारतीतील प्रसाधनगृहात गुरुवारी आत्मदहन करणाऱ्या तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी शुक्रवारी संध्याकाळी तिच्या घरच्यांना सापडली आह़े. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी विल्यम केरी नावाच्या रेल्वे निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
गुरुवारी दुपारी अनिता पटेल या २३ वर्षांच्या तरुणीने डीआरएम कार्यालयातील प्रसाधनगृहात आत्मदहन केल़े जेटीबीएस प्रणाली नाकारल्यानंतर अनामत रक्कम आणि बँक ठेव परत मिळवण्यासाठी ही तरुणी येथे आली होती. ही रक्कम तिला न मिळाल्याने तिने नैराश्यातून आत्मदहन केल्याची माहिती मिळाली होती. मात्र गुरुवारी रात्री या मुलीचे वडील कमलाप्रसाद पटेल यांनी रेल्वे निरीक्षक विल्यम केरी यांच्याविरोधात एमआरए मार्ग पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी तपास करत असताना शुक्रवारी संध्याकाळी अनिताने लिहिलेली चिठ्ठी तिच्या कुटुंबियांना घरी सापडल्याचा दूरध्वनी पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांचे एक पथक डोंबिवली येथे रवाना झाल्याची माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. या चिठ्ठीतील मजकूर रात्री उशिरापर्यंत कळू शकला नाही.