शासनाने भाडेपट्टय़ाने दिलेल्या भूखंडात मोठय़ा प्रमाणात अनियमितता

माझगाव येथील शासनाच्या मालकीच्या भूखंडाची सहा वर्षांपूर्वी बेकायदा विक्री करून घोटाळा केल्याप्रकरणी ‘कच्छी लोहाना निवास गृह ट्रस्ट’ तसेच विकासक गोल्ड प्लाझा यांच्याविरुद्ध शहर जिल्हाधिकाऱ्यांनी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

माझगाव येथे मोक्याच्या ठिकाणी सुमारे दोन एकर भूखंड शासनाने वुमेन मिशनरी सोसायटीला १९१७ मध्ये भाडेपट्टय़ावर दिला होता. या सोसायटीने हा भूखंड शासनाची परवानगी न घेता ‘कच्छी लोहाना गृह ट्रस्ट’ला विकला. २००५ पर्यंत मालमत्ता पत्रकावर ‘वुमेन मिशनरी सोसायटी’चे नाव होते. २००५ मध्ये यापैकी काही भूखंड मे. एस इंटरप्राईझेसला विकण्यात आला तेव्हाही ट्रस्टने शासनाची परवानगी घेतली नाही.

कोटक यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकरणी विभागीय आयुक्त राधेशाम मोपलवार यांच्याकडे झालेल्या सुनावणीत १३९९ चौरस मीटर हा भूखंड शासकीय तर उर्वरित ३१८२ हा भूखंड पेन्शन अँड टक्स असल्याचे मान्य केले गेले.  शहर जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्याकडे कोटक यांनी पुन्हा तक्रारी केल्या. अखेर जिल्हाधिकारी श्रीमती जोशी यांनी ४ ऑगस्ट रोजी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या अहवालात, १३९९ चौरस मीटर इतकाच भूखंड शासकीय असल्याचे मान्य केले आहे. शासनाने भाडेपट्टय़ाने दिलेल्या भूखंडाबाबत मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याचेही मान्य करताना जोशी यांनी संबंधितांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार भायखळा पोलीस ठाण्यात ट्रस्ट तसेच विकासकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कच्छी लोहाना ट्रस्टने गोल्ड प्लाझा या विकासकाला विकलेला सुमारे एक एकर भूखंड हा शासकीय असून संपूर्ण भूखंड परत घेण्याची आवश्यकता आहे. याबाबत आपला लढा सुरुच राहणार असल्याचे कोटक यांनी सांगितले. दरम्यान, या विक्री व्यवहारात कुठलाही घोटाळा नाही, असा दावा ‘गोल्ड प्लाझा’चे गिरीश जैन तसेच कछ्छी लोहाना गृह ट्रस्टचे विश्वस्त तुलसीदास ठक्कर-डुंगरसी यांनी केला आहे.

घोटाळा दाबण्याचा प्रयत्न

हा भूखंड ट्रस्टच्या नावे करण्यात आला. त्यानंतर ट्रस्टने २०१० मध्ये सुमारे एक एकर भूखंड ‘गोल्ड प्लाझा’ या विकासकाला विकला. तेव्हाही शासनाची परवानगी घेण्यात आली नाही. यामुळे शासनाचे नुकसान झाल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते जयेश कोटक यांनी वेळोवेळी लक्षात आणून दिली. तरीही हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला.