अश्लील चित्रफीतप्रकरणी पोलिसांकडून जाबजबाब
मुंबई : अश्लील चित्रफीतप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या जुहू येथील घरी छापा घातला असून शुक्रवारी शिल्पा शेट्टी हिचा जबाब नोंदवून घेण्यात आला. कारवाईदरम्यान शिल्पा शेट्टीचा पती आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी राज कुंद्रालाही पोलीस तेथे घेऊन गेले होते.

राज कुंद्रा याने आर्म्स प्राइम मीडिया ही कंपनी स्थापन केली होती. त्याद्वारे ‘हॉटशॉट’ हे अ‍ॅप विकसित केले होते. ते अ‍ॅप लंडन येथील केनरिन या कंपनीला विकले होते. मात्र राज कुंद्रा याच्या विआन इंडस्ट्रीज या कंपनीच्या माध्यमातून हे अ‍ॅप चालवले जात होते. या अ‍ॅपद्वारे पॉर्न चित्रफितींची निर्मिती आणि प्रसारण केले जात होते, असा आरोप आहे.

दरम्यान शिल्पा शेट्टीसुद्धा विआन इंडस्ट्रीज कंपनीत एक संचालक आहे. त्यामुळे या गुन्ह््यात शिल्पा शेट्टीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. मुंबई पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी शिल्पा शेट्टीच्या घरी छापा घातला.  पोलिसांनी घरातील लॅपटॉप आणि प्रकरणाशी संबंधित अन्य इलेक्ट्रॉनिक दस्तावेज ताब्यात घेतले.  शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवून घेतला आहे.

 

चित्रफितीतून मिळालेला पैसा सट्टेबाजीत?

अश्लील चित्रफितींच्या प्रसारणातून आलेला पैसा सट्टेबाजीमध्ये गुंतवल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. जागतिक पातळीवर बेटिंगमध्ये असलेल्या मक्र्युरी इंटरनॅशनल या कंपनीच्या बँक ऑफ आफ्रिका या बँकेच्या खात्यातून राज कुंद्राच्या येस बँकेतील खात्यात काही रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. ही रक्कम सट्टेबाजाराच्या व्यवहारातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त के ला आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी राज कुंद्राला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला २७ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

अटक बेकायदा असल्याचा राज कुंद्रा याचा दावा

अटक बेकायदा असल्याचा दावा करत अश्लील चित्रपटनिर्मितीच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले व्यावसायिक राज कुंद्रा यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. काही दिवसांपूर्वीच कुंद्रा यांना अटक करण्यात आली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. परंतु आपली अटक ही बेकायदा असून आपल्याला पोलीस कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करावा व आपली सुटका करावी, अशी मागणी कुंद्रा यांनी याचिकेद्वारे केली आहे. पोलिसांनी आपल्याला अटक करताना फौजदारी दंडसंहितेच्या कलम ४१(ए)चे उल्लंघन केले असून या बेकायदा अटकेमुळे आपल्याला खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे, तर पोलीस कोठडी सुनावण्याचे २० जुलैचे आदेशही उपरोक्त कलमाचे उल्लंघन असल्याचा दावा कुंद्रा यांनी केला आहे.  आपण अश्लील चित्रपटनिर्मिती करत असल्याचा कुठलाही पुरावा पोलिसांकडे नसल्याचा दावाही कुंद्रा यांनी केला आहे.