ठाणे येथील साकेत सब स्टेशनमधील सुमारे आठ लाख रुपयांचे नादुरुस्त ट्रान्सफार्मर गायब करून अपहार केल्याप्रकरणी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणामुळे त्या अभियंत्यास निलंबित करण्यात आल्याचे महावितरणच्या सुत्रांकडून समजते.
शेख अब्दुल कबीर शेख अहमद, असे महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याचे नाव असून त्याच्याकडे ठाणे विभागाची जबाबदारी आहे. साकेत येथील सब स्टेशनमध्ये चार नादुरुस्त ट्रान्सफार्मर होते. ७ डिसेंबर २०१२ रोजी शेख यांनी हे ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यासाठी ट्रकमधून नेले. मात्र, अंबरनाथ येथील कंपनीमध्ये दुरुस्तीसाठी न नेता ते परस्पर गायब केले. महावितरणचे वागळे परिमंडळ उप कार्यकारी अभियंता सुखदेव राऊत यांनी ट्रान्सफार्मरबाबत चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला.