पॅराशुट मधून अज्ञात महिला उतरल्याचा प्रकार शनिवारी (दि. २ फेब्रुवारी) रात्री नवी मुंबईच्या घणसोलीत घडला. या प्रकारामुळे परिसरात निरनिराळे तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, त्या अज्ञात महिलेविरोधात अखेर रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे.

घणसोली सेक्टर-१५मधील समर्थ हाइट्स या इमारतीच्या २४व्या मजल्यावरून या महिलेने पॅराशूटच्या सहाय्याने बेस जम्पिंग केल्याचं आता समोर आलं आहे. या महिलेने समर्थ हाइट्स या इमारतीमध्ये परवानगी न घेता प्रवेश केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही प्रत्यक्षदर्शीनी परिसरात पॅराशुट उडताना पाहुण पोलीसांना माहिती दिली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली, मात्र तोपर्यंत ही महिला एका व्यक्तीसोबत निघून गेली होती. या महिलेने ज्या इमारतीवरून पॅराशूटद्वारे बेस जपिंगचा क्रीडा प्रकार केला, त्या इमारतीच्या २४व्या मजल्यावर तसेच इमारतीच्या पायऱ्यांवर आणि पामबीचलगत असलेल्या कांदळवनाच्या मोकळ्या जागेत ही महिला जेथे पॅराशूटद्वारे उतरली. तेथील पायांच्या ठशांची पोलिसांनी पडताळणी केली असून ते एकाच व्यक्तीचे असल्याचे स्पष्ट झाले. ती महिला व तिच्यासोबतचा पुरुष कोण होता, याचा अद्याप थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे रबाळे पोलिसांनी या घटनेतील अज्ञात महिलेविरोधात समर्थ हाइट्स इमारतीत विनापरवानगी प्रवेश करून बेस जपिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली. ही संशयित महिला व पुरुषाचा शोध घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.