एका रुग्णासाठी दररोज पाच पीपीई पोषाख, मध्यरात्री वैद्यकीय चाचण्या

मुंबई : महाराष्ट्र सरकारने करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर लादलेल्या शुल्क मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

खासगी रुग्णालयांकरिता करोनाबधितांवरील उपचारांबाबत शासन, महापालिकेने वेळोवेळी अधिसूचना जारी केल्या आहेत. त्यात उपचार, शुल्क आकारणीबाबत सूचना जारी केल्या आहेत. या आदेशांचे पालन होते का? हे पडताळण्यासाठी महापालिकेने खासगी रुग्णालयावर निरीक्षक नेमले आहेत. त्यांच्याद्वारे रुग्णालयाने आकारलेल्या अवाजवी शुल्काची पडताळणी करण्यात आली.

दादर भागात राहणारी करोनाबधित महिला ३१ मे रोजी नानावटी रुग्णालयात दाखल झाली. १३ जूनला या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाने महापालिकेकडे रुग्णालयाने अवाजवी, जास्त शुल्क आकारल्याबाबत तक्रार केली. खातरजमा करण्यासाठी पालिकेच्या खासगी रुग्णालय निरीक्षकाने चौकशी, तपासणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. महिलेच्या उपचारांसाठी प्रतिदिन पाच पीपीई किट, तीन एन ९५ मास्क (उपलब्ध असूनही), अ‍ॅस्पिरिन, पॅरासीटामॉल, बी कॉम्प्लेक्स आदी नियमित वापराची औषधे ‘पॅकेज’मध्ये समाविष्ट असूनही त्याचे वेगळे शुल्क आकारले गेले. काही वैद्यकीय चाचण्या मध्यरात्री १ ते ३ या वेळेत करण्यात आल्या. १२ तासांपेक्षा जास्त वापर झालेल्या ऑक्सिजनपुरवठय़ाचेही पैसे शुल्कात जोडण्यात आले, अशी माहिती निरीक्षकाला मिळाली. पालिका निरीक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून रुग्णालय विश्वस्त मंडळावर भारतीय दंड संहितेतील कलम १८८ (शासकीय आदेशाचे उल्लंघन), ३४ (सामाईक इरादा) नुसार गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

नानावटीचा खुलासा

रुग्णाला आकारण्यात आलेले अतिरिक्त शुल्क या मुद्दय़ावरून गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळाली. रुग्णाच्या कुटुंबीयांची तक्रार पडताळणार आहोत. याविषयी रुग्णालयाकडून महापालिका, पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत, अशी प्रतिक्रिया नानावटी रुग्णालय विश्वस्तांकडून देण्यात आली. खासगी रुग्णालयांपैकी नानावटी रुग्णालयाने सर्वप्रथम करोनाबधितांवर उपचार सुरू केले.  आतापर्यंत रुग्णालयाने ११०० करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले आहेत, असेही सांगण्यात आले.