सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी फेब्रुवारी महिन्यातच आपण वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही त्यामुळे आपण पुढील तक्रार पाटणा पोलीस ठाण्यात केली असल्याचा दावा केला. मात्र अशी कोणतीही लेखी तक्रार सुशांतच्या वडिलांनी दाखल केली नव्हती असं आता मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी केलेला दावा मुंबई पोलिसांनी खोडून काढला आहे. २५ फेब्रुवारी रोजी कोणतीही लेखी तक्रार दाखल करण्यात आली नव्हती असं पोलिसांनी म्हटलं आहे.

सुशांतच्या वडिलांनी काय आरोप केला ?

सुशांतच्या जिवाला धोका आहे हे फेब्रुवारी महिन्यातच पोलिसांना सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही असा दावा सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी केला आहे. १४ जून रोजी सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली. त्यानंतरही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. मी त्यांना सुशांतच्या आत्महत्येनंतरही सांगितले की २५ फेब्रुवारीच्या तक्रारीत ज्यांची नावं आहेत त्यांच्यावर कारवाई करा. मात्र वांद्रे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी काहीही केलं नाही, त्यामुळे सुशांतच्या मृत्यूनंतर मी पाटणा या ठिकाणी तक्रार दाखल केली.

१४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर सगळं बॉलिवूड हादरलं. मात्र काही कलाकारांनी सुशांत सिंह राजपूत हा गटबाजी आणि घराणेशाहीचा बळी ठरला अशी तक्रार हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी केली. त्यानंतर या अँगलने मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.