रेलरोको आंदोलन करत मुंबईकरांना वेठीस धरणा-या आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांनी दिली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्यांवर कारवाई केली जाईल असं ते बोलले आहेत. मच्छिंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आंदोलनकर्ते वेगवेगळ्या ठिकाणावरुन आले होते. ते सकाळी एकत्र जमले आणि रेल्वे रुळावर आंदोलनासाठी उतरले. आंदोलनात सहभागी झालेल्यांवर कारवाई केली जाईल’.

दादर- मांटुगादरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली होती. रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरले होते. शेवटी साडे तीन तासांनंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.

अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे विद्यार्थ्याने सांगितले होते. रेल रोकोचे वृत्त समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी रेल्वे रुळावरुन हटण्यास नकार दिला. पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थी आणखी आक्रमक झाले.

ऐन गर्दीच्या वेळी रेल रोको झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मध्य रेल्वेकडून पुरेशी माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. शेवटी अनेकांनी रुळांवरुन चालतच रेल्वे स्थानक गाठले. या रेल रोकोचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला आहे. काही विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेनवरुन दगडफेकही केली. विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यात काही विद्यार्थी जखमी झाले. सकाळी दहाच्या सुमारास रेल्वेच्या वतीने एक टीम आंदोलनस्थळी पोहोचली. रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली.