बदलापूर येथील एमआयडीसी भागात भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर दरोडा पडल्याची घटना रविवारी रात्री घडली असून, यामध्ये दरोडेखोरांनी सुमारे दीड कोटींचा ऐवज लुटून नेला आहे. विशेष म्हणजे या शाखेच्या सुरक्षेकरिता रात्रपाळीला सुरक्षारक्षकच नव्हते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच या बँकेपासून बदलापूर पूर्व व ग्रामीण पोलीस ठाणे अवघ्या १०० मीटरच्या अंतरावर आहे. या दरोडय़ाच्या तपासाकरिता बदलापूर पोलिसांनी सात ते आठ पथके तयार केली असून, या पथकांनी दरोडेखोरांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.
सोमवारी सकाळी कर्मचारी कामावर आले, त्यावेळी बँकेत दरोडा पडल्याचे उघडकीस आले. बँकेच्या मागच्या बाजूचा दरवाजा कापून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला व सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर कापल्या. त्यानंतर गॅस कटर व इतर साहित्याच्या सहाय्याने तिजोरी फोडून त्यातील ७० लाखांची रोकड, सोने-चांदीचे दागिने, असा सुमारे एक कोटी ४४ लाखांचा ऐवज लुटून नेला.
बँकेत सिगारेटची जळालेली थोटके सापडली असून, या दरोडय़ासाठी किमान तीन-चार तासांचा अवधी लागला असावा, असे बँकेतील प्राथमिक तपासातून समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार, गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग माणेरे, परिमंडळ ४चे उपायुक्त वसंत जाधव, ईश्वर आंधळकर दिवसभर बँकेतील दरोडय़ाच्या घटनेचा आढावा घेत होते.