नोटाबंदीमुळे मंगलदास, क्रॉफर्ड, मनीष मार्केटमध्ये मंदी; व्यापाऱ्यांचे नुकसान, कारागिरांवरही उपासमारीची वेळ

मुंबईतील मोठय़ा बाजारपेठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगलदास, क्रॉफर्ड आणि मनीष मार्केट या बाजारांतील व्यवहारांना निश्चलनीकरणाचा जबरदस्त फटका बसला आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम असतानाही या बाजारांत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. गेल्या तीन आठवडय़ांमध्ये येथील निम्मे व्यवहार कमी झाले असून त्याचा परिणाम व्यापाऱ्यांचे नुकसान होण्यासोबत या ठिकाणी कार्यरत असलेले हमाल, कारागीर, मजूर अशा छोटय़ा घटकांवरही जाणवू लागला आहे.

दक्षिण मुंबईतील सुमारे दीडशे वर्षांपासून कपडय़ांसाठी प्रसिद्ध असलेल्या मंगलदास मार्केटमध्ये गेल्या २२ दिवसांपासून शुकशुकाट आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी दुकान बंद केले होते. सध्या येथील व्यवसाय ठप्प झाला असून ग्राहकांचा ओघ अध्र्याहून जास्त कमी झाला आहे. कपडय़ांवर नक्षीकाम करणाऱ्या कारागिरांना पैसे देण्यासाठी रोख नसल्यामुळे गेल्या १५ दिवसात नवीन माल आला नाही, असे ५ व्या गल्लीतील शशिकांत शाह या व्यापाऱ्याने सांगितले. ‘एरवी गजबजलेल्या मंगलदास मार्केटमध्ये आता निवांत क्रिकेट खेळता येईल, इतका शुकशुकाट आहे,’असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लग्न सराईतील कपडय़ांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुसऱ्या गल्लीत संतोष जैन यांचा गेल्या अनेक दिवसात व्यवसाय झाला नाही. तर गेली ६५ वर्षांपासून मेघराज कारिया येथे व्यापार करीत आहे.‘गेले २२ दिवस सुट्टी असल्याप्रमाणे आम्ही दुकान उघडून बसतो. ग्राहक कार्डने पैसे भरण्याबाबत विचारणा करतात. मात्र मशिन नसल्यामुळे आमची पंचाईत होते. बॅंक ऑफ बडोदा मंगलदासमधील व्यापारांकडून मोफत मशिनसाठी नोंदणी करून घेत आहे. आम्ही ती केली असून काही दिवसात कार्डने व्यापार करणे शक्य होईल,’ असे कारिया यांनी सांगितले.

क्रॉफर्ड मार्केटमध्येही हीच परिस्थिती असून बॅगविक्रेते, भाजीविक्रते, फळविक्रते आणि घरगुती वस्तूंच्या दुकानात ग्राहकांचा दुष्काळ जाणवत आहे. भेंडी बाजारात गेली ३२ वर्षे गालिच्याचा व्यापार करणारे सुकुमार शेरमये यांनी तीन आठवडय़ांत ७५ टक्के तोटा सहन करावा लागला, असे सांगितले. तर एरवी १० ते १५ हजार रुपयांचा धंदा आता ५ हजार रुपयांपर्यंत आला असल्याचे ‘किंग्स फॅबरिक’ या दुकानातील कपडय़ाचे व्यापारी मोहम्मद हुसेन यांनी सांगितले.

सेकंड हॅन्ड मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू मिळणाऱ्या मनीष मार्केटमध्येही हीच स्थिती आहे. दुकानदारांकडे मशिन नसल्यामुळे आणि २००० रुपयांचे सुटे नसल्यामुळे ग्राहक येत नाहीत, असे येथील दुकानदारांचे म्हणणे आहे.

मुंबई सोडून जावेसे वाटते..

क्रॉफर्ड मार्केटमध्ये ग्राहकांच्या मागे पाटी घेऊन फिरणाऱ्या आणि हातगाडीवरून माल वाहणाऱ्या रोजंदारीवरील कारागिरांची अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे. उत्तर प्रदेशातून दोन वर्षांपूर्वी मुंबईत उद्योग करण्यासाठी आलेला मुबारक अली हातगाडीवरून माल पोहोचविण्याचे काम करतो. ‘उन्हात २० ते ३० किलो सामान हाताने ओढत घेऊन जावे लागते. यासाठी एका फेरीमागे १०० रुपये मिळतात. दिवसाला अशा ८ फेऱ्या कराव्या लागतात. मात्र गेल्या अनेक दिवसात ३ फेऱ्या करणे शक्य होत आहे आणि मालकाकडे सुटे पैसे नसल्यामुळे दररोज १०० रुपयांच्या नोटा दिल्या जात नाही. त्यामुळे घरी पाठविण्यासाठी पैसेच उरत नाही,’ असे मुबारक अली म्हणाला. ‘अनेकदा ग्राहकांबरोबर २ ते ३ तास फिरावे लागते. आता ग्राहक सुटे पैसे नसल्याचे सांगून ३० ते ४० रुपये देतात. मोदींनी निर्णय घेतला आहे, तर नक्कीच चांगले होईल. पण मुंबईत रोजचे जगणं कठीण झालं आहे. गावी निघून जावंसं वाटतंय’, असे अली शेख या पाटी कामगाराने सांगितले.