वाजवी दर मिळत नसल्याने योजनेला नकार

अचानक आरोग्याची समस्या उद्भवल्यास आर्थिक जुळवाजुळव करण्यात वेळ वाया जाऊ नये, यासाठी अधिकाधिक नागरिक आरोग्य विमा योजनांचा स्वीकार करत असले, तरी मुंबईतील तेराशेहून अधिक नर्सिग होममध्ये ‘रोकडरहित’(कॅशलेस) उपचारांना नकार दिला जात असल्याचे दिसून येत आहे. विमा कंपन्यांकडून वाजवी दर मिळत नसल्याने ही सुविधा रुग्णांना देता येत नाही, असे नर्सिग होम असोसिएशनचे म्हणणे आहे.

आपात्कालीन परिस्थितीत पैशांची तरतूद करण्यासाठी धावाधाव करावयास लागू नये यासाठी नागरिक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विमा काढून घेतात. त्यामुळे घरात अचानकपणे उद्भवलेल्या एखाद्या आजारावर विमा कंपनीच्या मदतीने पैशांची सोय केली जाते. सार्वजनिक रुग्णालयातील गर्दी टाळण्यासाठी आणि पंचतारांकित रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याने सर्वसामान्य रुग्ण स्थानिक नर्सिग होमकडे धाव घेतात. येथील रोखविरहित सेवा बंद असल्यामुळे आरोग्य विमा असतानाही रुग्णांना पैशांची तरतूद करावी लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक नर्सिग होमनी रोखविरहित सेवा बंद केली आहे. सध्या मुंबईतील १५०० पैकी केवळ २१० नर्सिग होममध्ये रोखविरहित सेवा दिली जात आहे.

कमी खर्चात रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी विमा कंपन्या नर्सिग होम आकारत असलेल्या किमतीपेक्षा कमी पैशांची मागणी करतात. हा खर्च परवडत नसल्याने मुंबईतील अनेक नर्सिग होमने रोखविरहित सेवा बंद केली आहे, असे मुंबईतील नर्सिग होम असोसिएशनचे डॉ. दीपक बैद यांनी सांगितले.

विमा कंपन्या आणि नर्सिग होममध्ये देवाण-घेवाणीचे काम ‘टीपीए’मार्फत (थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्टर) केले जाते. मुंबईत ६८ ते ७० टक्के रुग्ण नर्सिग होममध्ये उपचार घेतात. सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी नर्सिग होममध्ये ४० हजार इतका खर्च येतो. मात्र रुग्णाने रोखविरहित सेवेची मागणी केल्यानंतर ‘टीपीए’ या शस्त्रक्रियेसाठी २८ हजाराची मागणी करतात, मात्र नर्सिग होमना यामध्ये नुकसान सहन करावे लागते. हे रोखण्यासाठी टीपीएने वाजवी दरात उपचाराचा दावा करणे आवश्यक आहे, असे मुकुंद रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बिपीन पंडित यांनी सांगितले.  पंचतारांकित रुग्णालयात मात्र विमा कंपन्या हा दर दुपटीने वाढतो. केवळ नर्सिग होमना वेठीस धरले जात आहे, असेही डॉ. पंडित यांनी सांगितले.

कमी पैशात अनुभवी डॉक्टर उपचार करण्यात तयार होत नाही. अशावेळी कमी पैशात कनिष्ठ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया केल्या जातात. याचा परिणाम गुणवत्तेवर होतो. त्यामुळे विमा कंपन्यांनी नर्सिग होमसाठी दरपत्रक लागू करावे.     – डॉ. दीपक बैद, नर्सिग होम असोसिएशन