नोटाबंदीला ८ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून मध्य रेल्वेवरील तिकीट व पास काढताना केल्या जाणाऱ्या कॅशलेस व्यवहारात आतापर्यंत चार टक्के वाढ झाली आहे. २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे दिवसाला १,६८४ प्रवाशांकडून पास तर १ लाख २३ हजार १०८ प्रवाशांकडून तिकीट काढले जात असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदी करताच ५०० व १००० रुपयांच्या नोटा खपवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर एकच झुंबड उडाली. यात सुट्टय़ा पैशांवरून बरेच वादही झाले. नोटाबंदीनंतर केंद्र सरकारकडून कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रेल्वेकडून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर पीओएस मशीन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मध्य रेल्वेने ६२४ तिकीट खिडक्यांवर ही यंत्रे बसविली. या मशीन बसवल्यानंतर डेबिट, क्रेडिटचा वापर करत डिसेंबर महिन्यात दिवसाला २२ पास तर १,९८१ प्रवाशांनी तिकीट खरेदी केले. जानेवारी २०१७ मध्ये हाच आकडा दिवसाला ८२६ पास आणि ७३ हजार ७१३ तिकीटपर्यंत पोहोचला. ऑक्टोबर २०१७ पर्यंत दररोज डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे १ लाख २३ हजार तिकिटे आणि १,६८४ पास विक्री झाली. पुढील काही महिन्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.