खिशात सुटे पैसे नाहीत, तरीही रेल्वे किंवा बेस्टचे तिकीट काढायचे आहे.. सुटय़ा पैशांपैकी थोडेच शिल्लक आहेत आणि मेट्रोचे टोकन घेताना ते खर्च करायचे नाहीत.. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे; पण खिशात एक छदामही न बाळगता केवळ मोबाइलचा वापर करून मुंबईतील बहुतांश सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ घेता येणे शक्य आहे. त्यासाठीच हा ‘कॅशलेस’ मार्ग..

पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीच्या दिवशी मुंबईत ठिकठिकाणी पुलोत्सव साजरे होत असताना त्याच दिवशी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. ‘मेरे प्यारे देशवासीयों.. मित्रों..’ अशा आग्रही आणि आर्जवी शब्दांची पखरण करत त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात ५००-१००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करत असल्याचे जाहीर केले. सुरुवातीला नरेंद्र मोदी पुलंच्या जयंतीनिमित्त काही तरी विनोद करत असावेत, असाही अनेकांचा समज झाला; पण थोडय़ाच वेळात हा भर ओसरला आणि लोकांना वस्तुस्थितीचे भान आले. दुसऱ्या दिवसापासून लोकांनी बँका, रेल्वे आरक्षण केंद्रे, मेट्रो तिकीट खिडक्या यासमोर ५००-१००० रुपयांच्या नोटा घेऊन रांगा लावायला सुरुवात केली.

रांगांचा आणि मुंबईकरांचा संबंध तसा खूपच जुना आहे. पूर्वी सकाळी दुधाच्या ‘लायनी’त उभे राहण्यापासून केरोसीन, रेशनवर मिळणारे धान्य, सिनेमाची तिकिटे यांसाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याचा ‘शिस्तप्रिय’पणा मुंबईकरांच्या अंगी भिनलेला आहे; पण आपलेच पैसे बदलण्यासाठी रांगा लावणे मुंबईकरांनाही जड जाताना दिसत आहे. पण मुंबईकरांनी ही रांगांची सवय सोडण्याची वेळ कधीच येऊन ठेपली आहे. त्याबाबत अनेकदा आपल्याला माहिती नसते किंवा अनेकदा मनात धाकधूक असते; पण बँकेच्या खात्यातून नेट बँकिंगमार्फत बिले भरणेही जेथे सर्वसामान्य मुंबईकरांच्या पचनी पडायला वेळ लागतो, तेथे रेल्वे किंवा बेस्टचे तिकीट मोबाइलवरून काढण्याची संकल्पना आपल्या गळी उतरण्यासाठी काही काळ जावा लागणारच. आता अचानक सुटय़ा पैशांची चणचण भेडसावू लागल्यानंतर खरे तर मुंबईकरांसमोर हे सर्व ‘कॅशलेस’ पर्याय हात जोडून उभे आहेत. मुंबईकरांच्या टॅक्सी-रिक्षा वगळता दैनंदिन सार्वजनिक प्रवासासाठी या पर्यायांचा वापर त्यांना दिलासा देणारा ठरेल.

रेल्वेची मोबाइल तिकीट प्रणाली

वापरण्यास अत्यंत सोपी, सुटसुटीत आणि सोयीची अशी ही प्रणाली ८० लाख उपनगरीय प्रवाशांपैकी फक्त तीन ते पाच हजार लोक सध्या वापरतात. आजकाल प्रत्येकाकडे असलेल्या स्मार्टफोनच्या प्ले स्टोअरमध्ये ‘यूटीएस ऑन मोबाइल’ हे अ‍ॅप उपलब्ध आहे. या अ‍ॅपवर जाऊन प्रवाशांना फक्त आपला मोबाइल नंबर नोंदवायचा आहे. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणत्याही एका ओळखपत्राचा क्रमांक आवश्यक आहे. एकदा ही माहिती भरली की, या प्रणालीकडून चार अंकी संकेतक्रमांक प्राप्त होतो. हा क्रमांक लक्षात ठेवण्यास सोपा असतो. या अ‍ॅपवर ‘आर वॉलेट’ नावाचे पैसे साठवण्याचे वॉलेट आहे. या वॉलेटमध्ये प्रवासी ऑनलाइन पैसे भरू शकतात किंवा तिकीट खिडक्यांवर जाऊन १०० रुपयांच्या पटीत पैसे भरू शकतात. सध्या ५००-१००० रुपयांच्या नोटा खपवण्यासाठी या अ‍ॅपचा पर्याय खरे तर मुंबईकरांना खूपच सोयीचा आहे.

या अ‍ॅपवरून प्रवासी मासिक-त्रमासिक-सहामाही-वार्षिक पास काढू शकतात. प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सिंगल किंवा रिटर्न तिकीट काढणेही शक्य होते. त्यासाठी प्रवासी रेल्वे परिसरापासून कमीत कमी ३० मीटर आणि जास्तीत जास्त दोन किलोमीटर लांब असणे अपेक्षित आहे. जवळचे स्थानक, गंतव्यस्थान, प्रवासी संख्या आदी तपशील टाकल्यानंतर एका क्लिकवर तिकीट प्राप्त होते. हे तिकीट किंवा क्यूआर कोड तिकीट तपासनीसाला दाखवता येतो. तिकिटाचे पैसे ‘आर-वॉलेट’मध्ये भरलेल्या पैशांमधून वजा होतात. तसेच पास संपायच्या दहा दिवस आधीपासून पास नूतनीकरण करण्याबाबतची आठवण हे अ‍ॅपच आपल्याला करून देते.

बेस्टचेही मोबाइल तिकीट

खालावलेली प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बेस्टने आपल्या कार्यपद्धतीत बदल करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. वीज भरणा करण्यासाठी थेट नेट बँकिंग आणि ई-पेमेण्टचा आधार घेणाऱ्या बेस्टने ‘रिडलर’ या अ‍ॅपच्या माध्यमातून बसचे तिकीटही मोबाइलवर देण्यास सुरुवात केली आहे. स्मार्टफोनच्य प्ले स्टोअरमध्ये असलेल्या या अ‍ॅपवर गेल्यावर मेट्रो, नवी मुंबई परिवहन सेवा यांच्यासह आता बेस्टचा पर्यायही उपलब्ध आहे. हा पर्याय निवडल्यानंतर प्रवासी त्यांचे सध्याचे मासिक पास नव्याने भरू शकतात किंवा प्रवासाचे तिकीट काढू शकतात. त्यासाठी प्रवाशांना बसमध्ये चढल्यानंतर त्यांच्या बसचा क्रमांक, प्रवास सुरू करण्याचा थांबा आणि गंतव्य थांबा ही माहिती भरायची आहे. प्रवाशांच्या बँकेच्या खात्यातून हे पैसे वजा होतात. प्रवाशांना ई-पर्सची सुविधाही त्यासाठी देण्यात आली आहे. या तिकिटाचा संदेश प्रवाशांच्या मोबाइलवर आल्यानंतर वाहकाकडून प्रवाशांना तिकीट छापील स्वरूपात घेता येणार आहे.

मेट्रोही आता कॅशलेस

५००-१००० रुपयांच्या नोटांबाबत निर्णय झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घाटकोपर येथील मेट्रो स्थानकात तिकीट खिडकीवरील कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात प्रचंड बाचाबाची झाली होती. त्यावरून धडा घेत मेट्रोने बुधवार, १६ नोव्हेंबरपासून ‘पेटीएम’च्या सहकार्याने कॅशलेस मेट्रो तिकीट सुरू केले आहे. त्यासाठी प्रवाशांना आपल्या स्मार्टफोनवर ‘पेटीएम’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. आपल्या बँकेच्या खात्यातून या अ‍ॅपमधील ‘वॉलेट’मध्ये पैसे भरता येणार आहेत. तिकीट खिडक्यांजवळ पेटीएमवरून तिकीट काढण्यासाठी क्यूआर कोड लावला असेल. पेटीएम अ‍ॅपवर जाऊन हा क्यूआर कोड स्कॅन करून प्रवाशांना एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंतचे तिकीट काढता येणार आहे. त्यांचे पैसे त्यांच्या वॉलेटमधून वजा होतील. तिकीट खिडकीवर असलेल्या व्यक्तीकडे याबाबतचा संदेश जाणार असून प्रवाशाच्या मोबाइलवर आलेल्या संदेशाशी तो पडताळून बघून प्रवाशांना टोकन देण्यात येईल.

या तीन प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवांशिवाय काही रिक्षा व टॅक्सीचालकही पेटीएम, फ्रीचार्ज आदी पर्याय वापरत आहेत. गरज आहे ती आपल्यासारख्या ‘ग्राहकां’नी सजग होऊन रोखीचे व्यवहार कमी करायची! थोडा विचार करा, बेस्टमध्ये वाहकाशी, रिक्षावाल्याशी सुटय़ा पैशांवरून वादावादी

करून स्वत:चे मानसिक स्वास्थ्य खराब करून घेण्याऐवजी आपल्या हातातल्या मोबाइलवर एक क्लिक करून प्रवास सुखद होऊ शकतो. कोणी तरी म्हणून गेले आहे तेच खरे, ‘तुमचं ‘भविष्य’ तुमच्या ‘हातात’ आहे.’

@rohantillu

Email – tohan.tillu@expressindia.com