|| उमाकांत देशपांडे

आता समतानगर, भीमनगर, ज्योतीनगर, शाहू नगर असे नामकरण

मुंबई : राज्यभरातील वाडय़ा-वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असून, त्याबाबतचा प्रस्ताव बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.

गावागावांमधील वाडय़ा-वस्त्यांचा महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, चांभारवाडी असा उल्लेख केला जातो. वस्त्यांच्या नावाला जात जोडण्याची ही प्रथा बंद करावी आणि त्याऐवजी आता या वस्त्या-वाडय़ांचे समतानगर, क्रांतिनगर, भीमनगर, ज्योतीनगर, शाहू नगर असे नामकरण करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. वाडय़ा-वस्त्यांच्या नावांमध्ये जाती-जमातींचा उल्लेख करणे अनुचित आहे. गावांचा विकास झाला, तरी अनुसूचित जातींच्या नागरिकांच्या वस्त्यांच्या नावांमध्ये जातीचा उल्लेख केला जातो. त्यामुळे या वाडय़ावस्त्यांचे नामांतर करण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना सूचना केली होती, असे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार हा प्रस्ताव तयार केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार राज्य सरकारकडून देण्यात येत होता; पण पुरस्कारातून ‘दलित’ हा उल्लेख काढून टाकण्याचा निर्णय २ एप्रिल २०१२ रोजी राज्य सरकारने घेतला होता व त्याऐवजी ‘समाजभूषण’ पुरस्कार असे नमूद करण्यास सुरुवात केली. राष्ट्रपतींनी राज्यघटनेच्या ३४१ कलमानुसार १८ सप्टेंबर २०१९ रोजी निर्देश दिले असून शासनाच्या कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पुरस्कार यामध्ये ‘दलित’ असा उल्लेख न करता अनुसूचित जाती व नवबौद्ध असा उल्लेख करावयास सांगितले आहे. त्याला अनुसरून आता सरकारने वाडय़ा-वस्त्यांच्या नावांमधून जात हद्दपार करण्याचे ठरविले आहे.

अन्य विभागांची अनुकूलता

सामाजिक न्याय विभागाने वाडय़ा-वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार करण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग व महसूल विभागाने त्यासाठी अनुकूलता दर्शविली असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या क्षेत्रांनुसार कार्यवाही होणार असल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.