बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणारे जातवैधता प्रमाणपत्र घेण्याची तयारी अकरावीपासूनच सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या असून, त्याची जबाबदारी शाळा, महाविद्यालयांवर सोपवली आहे.

बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र द्यावे लागते. उच्च न्यायालय आणि प्रवेश नियंत्रण प्रधिकरणाकडून जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या कालावधीत विद्यार्थी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची घाई होते आणि व्यवस्थेवरही ताण येतो. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे प्रमाणपत्र देण्याच्या हमीच्या आधारे दिलेल्या प्रवेशांमुळे अनेकदा गोंधळ होते.

विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे आता प्रमाणपत्र काढण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालयांवरच सोपवली आहे. अकरावीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रासाठी महाविद्यालयाकडून प्रस्ताव पाठवण्यात यावेत, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.