माहीममधील ‘अल्ताफ’ची पडझड ताजी असतानाच सोमवारी मध्यरात्री माहीमच्याच ‘रेल व्ह्य़ू’ इमारतीत पाण्याच्या टाकीसह जिन्याचा काही भाग कोसळला. मात्र दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तर वाकोला, गावदेवी येथील लसूणवाडीत भिंत कोसळून तीन लहान मुले जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माहीम रेल्वे स्थानकाजवळील सेनापती बापट मार्गावरील तीन मजली ‘रेल व्ह्यू’ इमारतीमधील पाण्याची टाकी आणि जिन्याचा काही भाग सोमवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास कोसळला. या इमारतीत अलबर्ट अ‍ॅन्ड्रीक्स (३५) आणि रश्मी अ‍ॅन्ड्रीक्स (३०) दाम्पत्य राहात होते. अग्निशामक जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना सुखरूप बाहेर काढले.
वाकोलाच्या गावदेवी परिसरातील लसूणवाडीत सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास एक भिंत कोसळून दीपक चव्हाण (७), दिव्या सहानी (५) आणि रितीक कांबळे (५) ही तीन मुले जखमी झाली. सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसात बॅरिस्टर नाथ पै मार्ग, प्रभादेवीचा घाणेकर मार्ग, भांडुपच्या टेंभीपाडय़ात, कामाठीपुरा दहावी गल्ली, मालाड (प.) येथील रातोडी गावात, सांताक्रूझ (पू.) येथील डवरी नगरात इमारतीचे प्लास्टर अथवा संरक्षक भिंत कोसळल्याच्या किरकोळ घटना घडल्या.  
भाईंदरमध्ये बाल्कनी कोसळली
भाईंदरमधील एका जुन्या इमारतीची सामूहिक बाल्कनी कोसळून एक पादचारी जखमी झाला. मंगळवारी सकाळी पावणेआठला ही दुर्घटना घडली.
भाईंदर पश्चिमेच्या महेशनगरमधील सात क्रमांकाची इमारत ३५ वर्षे जुनी आहे. तिला सामूहिक बाल्कनी आहे. सकाळी पाऊस पडत असतांना तिसऱ्या मजल्याची सामूहिक बाल्कनी अचानक कोसळली. त्याचवेळी या इमारतीच्या खालून जाणारे नवीन दोशी (५२) हे जखमी झाले. त्यांना तातडीने नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या म्डोक्याला ३२ टाके पडले. बाल्कनी कोसळल्याने रहिवाशांमध्ये एकच घबराट पसरली. अनेक रहिवासी इमारतीमध्ये अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन लोकांना शिडीच्या सहाय्याने बाहेर काढले.
या इमारतीमधील सर्व रहिवाशांची पालिकेने निवारा केंद्रात सोय केली आहे. पालिकेमार्फतच त्यांची जेवणाची सोय करण्यात आली आहे. पालिकेने शहरातील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नव्हते, अशी माहिती मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. या दुर्घटनेनंतर शहरातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करवून घेण्यासाठी प्रभागनिहाय पथके तयार करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.

दरड कोसळून ३ मजूर ठार
खास प्रतिनिधी, नवी मुंबई<br />खैरणे येथील दगडखाणीजवळील संरक्षक भिंत कोसळून दोन कामगार ठार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी तुर्भे येथील बोनसारी परिसरातील एका दगडखाणीजवळील दरड कोसळून तीन मजूर ठार झाले. संततधार पावसामुळे हे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यास पाच तासाचा वेळ लागला.
तुर्भे बोनसारी येथे साईनाथ पाटील यांची दगडखाण आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तेथे खाणकाम सुरू असताना अंगावर दरड कोसळून तीन मजूर ठार झाले.
पोलूस टप्पू आणि ललीत टप्पू अशी दोन भावांची नावे असून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ते बिहारचे रहिवाशी आहेत. एका मृतदेहाची रात्री उशिरपत ओळख पटू शकली नाही.