राज्यात ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ अभियानांतर्गत उद्योग, व्यवसायांना परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारने उपाहारगृहे आणि पर्यटन व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. उपाहारगृहे आणि मोठय़ा हॉटेलांमध्ये बसून लवकरच खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात येत असून, त्यावर शिक्कामोर्तब करून उपाहारगृहे, हॉटेलांना परवानगी दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून हॉटेल्स-रेस्टॉरंट बंद आहेत. त्यामुळे या व्यवसायाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, हजारो लोकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपाहारगृहे सुरू करण्यास लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी झाले होते.

पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉज सुरू करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक अभ्यागत, पर्यटकाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. एक करोनाबाधित हॉटेलमध्ये आला तरी सर्व कर्मचारी  बाधित होऊ शकतात. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हॉटेल्स सुरू करायला काही अडचण नाही. मात्र, राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नियमांचे पालन करावे लागणार आहे. याबाबतची कार्यपद्धती तयार करण्यात आली असून ती संघटनांना दिली जाईल. त्यांच्याशी चर्चा करून ही कार्यपद्धती अंतिम करून हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये. स्थानिक कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत. त्यांना कामावरून काढू नका. या संकटाच्या काळात कामगार संघटनाही अवाजवी मागण्या करणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त के ला.

या उद्योगाला आता खेळते भांडवल आवश्यक असल्याचे मत इंडियन हॉटेल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष गुरुबक्ष सिंग कोहली यांनी व्यक्त केले. सर्वत्र नोकऱ्या जात आहेत. मात्र, आम्ही कर्मचाऱ्यांच्या रोजगाराची काळजी घेत आहोत. आता काही प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरक्षित अंतर ठेवून सुरू करायला परवानगी द्यावी, जेणेकरून पर्यटक जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रात, मुंबईत राहतील आणि येथील पर्यटन उद्योगाला चालना मिळेल, असे कोहली म्हणाले.

मोकळ्या जागेचा वापर करण्याची मागणी

हॉटेल सुरू करताना दोन टेबलांदरम्यान दोन मीटर ठेवण्यात येणार असल्याने जागा कमी पडेल. त्यास पर्याय म्हणून मोकळ्या जागेचा वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी गुरुबक्ष सिंग कोहली यांनी केली. नियमावली निश्चित झाल्यानंतर चार दिवसांत हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.