‘लालबाग राजा’च्या कार्यकर्त्यांनी भाविकांशी केलेले गैरवर्तन आणि विनयभंगाप्रकरणी गुन्हे दाखल करा, असे आदेश दस्तुरखुद्द गृहमंत्र्यांनी देऊनही पोलिसांनी अद्याप गुन्हे दाखल केलेले नाहीत. मंडळाचा किती दबाव आहे, ते यानिमित्ताने पुन्हा दिसून आले.
गैरवर्तनाच्या चित्रफिती माध्यमातून आणि सोशल नेटवर्किंगमधून फिरू लागल्यानंतर सर्वत्र जनक्षोभ उसळलेला होता. त्याची दखल घेत गृहमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. परंतु तरीही कार्यकर्त्यांची मुजोरी सुरूच होती. गणपती विसर्जन झाल्यानंतर कारवाई केली जाईल, असे काळाचौकी पोलिसांनी सांगितले होते. गुरुवारी खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सहआयुक्तांना फोन करून तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी मुजोर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतील, अशी अपेक्षा होती. पण विनयभंगाचा एकही गुन्हा दाखल केला की नाही त्याची महिती नसल्याचे परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त दत्तात्रेय कराळे यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक अशोक शरमळे यांना मारहाण करणाऱ्या मनोज मिश्रा याला अटक करून नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. पण महिला पोलीस शिपाई कविता पाळेकर यांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ठाण्याच्या एका महिलेने
पोलीस उपायुक्तांना चार दिवसांपूर्वी विनयभंग झाल्याची लेखी तक्रार दिली होती़  मात्र अजूनही त्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, मगच निर्णय घेऊ, असे काळाचौकी पोलिसांनी सांगितले.
दैनिकाच्या छायाचित्रामुळे तिघांवर गुन्हे
एका इंग्रजी दैनिकाने लालबाग राजा परिसरात एका तरुणीचा विनयभंग झाल्याचे छायाचित्रे शुक्रवारी प्रसिद्ध केली होती. त्या प्रकरणी तीन अज्ञात इसमांविरोधात विनयभंगाचे गुन्हे दाखल केल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गिते यांनी दिली.