News Flash

अनिल देशमुख प्रकरणातील चौकशी अहवाल लीक झाल्याप्रकरणी सीबीआयच्याच अधिकाऱ्याला अटक

अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून बुधवारी वकिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

CBI arrests officer leaked enquiry report Anil Deshmukh case

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील अंतर्गत चौकशीची कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी स्वतःच्याच अधिकाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान, याआधी बुधवारी रात्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चतुर्वेदी यांची सीबीआयने चौकशी करुन त्यांची सुटका केली आहे. चतुर्वेदी वरळीतील सुखदा या इमारतीमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. अनिल देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली होती.

सीबीआयचे उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी अभिषेक तिवारी यांना अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांकडून लाच घेतल्यानंतर अटक करण्यात आली. इंडिया टुडेच्या सूत्रांनुसार ते कथितपणे अनिल देशमुखांच्या वकिलाच्या संपर्कात होते. अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून बुधवारी वकिलांनाही ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याची चौकशी सीबीआयकडून चौकशी केली जात आहे.

“सीबीआयने आपले उपनिरीक्षक, नागपूरस्थित वकील आणि अज्ञात इतरांच्या विरोधात लाचप्रकरणी काही आरोपांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सीबीआयने बुधवारी उपनिरीक्षकाला अटक केली आहे. तसेच वकिलाची चौकशी केली जात आहे, ”असे सीबीआयचे प्रवक्ते आर सी जोशी यांनी इंडिया टुडेला सांगितले. प्रयागराज आणि दिल्ली येथील अभिषेक तिवारी यांच्याशी संबधित असलेल्या ठिकाणीही सीबीआयद्वारे शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांचीही चौकशी केली. नंतर सीबीआयने त्यांना जाण्यास परवानगी दिली. यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “केंद्रीय तपास यंत्रणांनी आज अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटीसीशिवाय उचलून नेले असे कळते. हे अत्यंत गंभीर आहे. “देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे” असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. जाहीर निषेध!,” असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

विविध वृत्तसंस्थांना पाठवलेल्या ६५ पानांच्या लीक झालेल्या कागदपत्रांमधून सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोणताही अदखलपात्र गुन्हा करता येणार नाही असे मत मांडले आणि प्राथमिक चौकशी बंद करण्याची शिफारस केली असल्याचे समोर आले होते. मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने अनिल देशमुख आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 7:31 am

Web Title: cbi arrests officer leaked enquiry report anil deshmukh case abn 97
टॅग : Cbi
Next Stories
1 मुंबईला डेंग्यूचा ‘ताप’
2 वांद्रे-वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्पाची कासवगती
3 हाजीअलीतील कचऱ्यापासून वीजनिर्मितीला उद्याचा मुहूर्त
Just Now!
X