मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जीव्हीके उद्योग समूहाचे अध्यक्ष व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी यांच्यासह मुलगा जीव्ही संजीव रेड्डी यांच्याविरुद्ध सीबीआयनं ७०५ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

जी वेंकट कृष्णा रेड्डी, जीव्ही संजीव रेड्डी यांच्यासह इतर आरोपींनी २०१७ ते २०१८ या कालावधीत सर्व आरोपींनी विमानतळाच्या दुरुस्ती व विकास कामांसाठी ३१० कोटींचे बोगस करार केला. त्यानंतर हा पैसा भारताबाहेर नेऊन वेगवेगळ्या कंपन्यामध्ये गुंतवला. सर्व आरोपींनी २०१२ ते २०१८ या काळात तब्बल ७०५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड अर्थात एमआयएएल नावाची जॉईंट व्हेंचर कंपनी जीव्हीके एअरपोर्ट होल्डिग्ज लिमिटेड, एअरपोर्ट अथॉरिटी इंडिया व इतर काही विदेशी कंपन्यांनी तयार केली होती. यात जीव्हीकेचे ५० टक्के शेअर्स होते, एएआयचे २६ टक्के शेअर्स होते. तर उर्वरित शेअर्समध्ये इतर कंपन्यांकडे होते.

२०१२ ते २०१८ या कालावधीत जीव्हीके उद्योग समूहाने एमआयएएलचे ३९५ कोटींचे सरप्लस फंड स्वतःच्या खासगी कंपनीमध्ये गुंतवून एमआयएएलला तोटा पोहोचवल्याचा ठपका सीबीआयनं ठेवला आहे. त्याचबरोबर जीव्हीकेनं विमानतळ विकास व व्यवस्थापन खर्चासाठी वाढीव खर्च दाखवला आणि १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला, असंही सीबीआयनं आरोपात म्हटलं आहे. याप्रकरणी सीबीआयनं जीव्हीके उद्योग समूहाचे अध्यक्ष व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी, मुलगा जीव्ही संजीव रेड्डी यांच्यासह गैरव्यवहारात सहभागी असलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.