गुजरात येथील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दोषमुक्त करण्याचा सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. शहा यांना दोषमुक्त ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र नंतर त्याने याचिका मागे घेतली. ज्या रुबाबुद्दीनमुळे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासह खटला गुजरातऐवजी महाराष्ट्रात चालवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याचमुळे एवढे सगळे करणाऱ्या रुबाबुद्दीनने अचानक याचिका मागे का घेतली याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच त्याने दबावाखाली ही याचिका मागे घेतल्याचा आरोप करत या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्याची व शहा यांना दोषमुक्त करणारा सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची मागणी माजी आयएएस अधिकारी हर्ष मंडेर यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली होती. रुबाबुद्दीनने माघार घेतली असली तरी जनहित लक्षात घेऊन आपण ही याचिका केली आहे, असा दावाही मंडेर यांनी याचिकेत केला होता.