अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. सीबीआयने जवळपास ७ जणांची चौकशी केली आहे. विशेष म्हणजे यात सुशांतचा केअर टेकर दिपेश सावंत आणि सिद्धार्थ पिठानी माफीचे साक्षीदार होण्यास तयार असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

दिपेश सावंत हा सुशांतचा केअर टेकर असल्यामुळे सीबीआयच्या तपासात त्याला महत्त्वाची व्यक्ती मानलं जात आहे. तर सिद्धार्थ पिठानी हा सुशांतचा रुममेट होता. या दोघांनीही सीबीआय तपासादरम्यान महत्त्वाची माहिती दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच या तपासकार्यात त्यांची मदत होऊ शकते. या कारणास्तव ते माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : आदित्य ठाकरेंसोबत भेट झाली होती का?, रिया चक्रवर्ती म्हणते….

८ जून रोजी रिया आणि सुशांतचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर रियाने ८ हार्ड ड्राइव्ह नष्ट केल्या आणि ती घरातून निघून गेल्याचं, दिपेश आणि सिद्धार्थने सांगितलं आहे. तसंच सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली त्यादिवशी दिपेश आणि सिद्धार्थ घरीच होते. इतकंच नाही तर सुशांतच्या मृत्यूनंतर दिपेश काही काळ गायब होता. त्याला ईडीनेदेखील समन्स बजावले होते.

वाचा : मलाही आत्महत्या करावीशी वाटते, मग त्याला जबाबदार कोण असेल ?- रिया चक्रवर्ती

दरम्यान, सीबीआयपूर्वी दिपेशची मुंबई पोलिसांनी तीन वेळा आणि ईडीने दोन वेळा चौकशी केली आहे. त्यानंतर सीबीआय या प्रकरणी चौकशी करत आहेत. सध्या दिपेश सीबीआय थांबलेल्या DRDO गेस्ट हाऊसमध्ये असून त्याला बाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे.