‘लोकसत्ता यशस्वी भव’ या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या मार्गदर्शन उपक्रमाच्या माध्यमातून यशस्वी ठरलेल्या तीन विद्यार्थिनींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या वतीने करण्यात येणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. टांकसाळे यांनी येथे केली.
दहावी-बारावीत घवघवीत यश मिळविणाऱ्या सेंट्रल बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा नुकताच विलेपार्ले येथील ‘सोराबजी पोचखानवाला बँकर्स ट्रेनिंग महाविद्यालया’त गौरव करण्यात आला. दहावीतील देवांशी ठाकूर (९८टक्के), शुभ्रा कांथ (९६टक्के) आणि बारावीतील बी. अक्षया (९४.६०टक्के) आणि अवंती पालेकर (९३.३३टक्के) या विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
सेंट्रल बँकेने गेल्या वर्षी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील दहा शाळांमधील १२५० विद्यार्थ्यांना ‘यशस्वी भव’ उपक्रमाच्या माध्यमातून दत्तक घेतले होते. या दहा शाळांपैकी सात शाळांचा निकाल ८८ ते ९५ टक्के तर तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
या शाळांमधील उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा पदवी परीक्षेपर्यंतचा सर्व खर्चही बँक करेल, अशी घोषणा टांकसाळे यांनी केली. तसेच, ‘लोकसत्ता यशस्वी भव’च्या माध्यमातून सेंट्रल बँक गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी सदैव उभी राहील, अशी ग्वाही यावेळी टांकसाळे यांनी दिली.
या तीन विद्यार्थिनींपैकी डोंबिवलीच्या ‘सरलाबाई म्हात्रे शाळे’च्या हर्षदा म्हसकर आणि रतिका मानवल या विद्यार्थिनींनी सीए होण्याचा निर्धार व्यक्त केला. पोलादपूरच्या ‘वरदायिनी माध्यमिक विद्यालया’च्या सरिता सकपाळ हिच्या शिक्षणाचा खर्चही बँकेतर्फे करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या सेंट संस्कृतीच्या अध्यक्ष नंदिनी टांकसाळे, बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गोएल, सरव्यवस्थापक संदिपदास गुप्ता, मुंबई विभागीय सरव्यवस्थापक बी. के. सिंघल, ठाण्याचे क्षेत्रीय प्रबंधक सतीशकुमार मुक्ते, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. मुक्ते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.