सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर सीबीआयची विशेष टीम सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झाली आहे. मुंबईत आल्यानंतर सीबीआयने वेगाने तपास सुरु केल्याचं दिसत आहे. सीबीआय टीमकडून सुशांतच्या स्टाफ कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रं घेतली आहेत. यामध्ये सुशांत सिंहचा शवविच्छेदन अहवालाचाही समावेश आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सीबीआयची १० सदस्यीय टीम गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाली. पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली टीम तपास करत आहे. महत्त्वाचा साक्षादीर मानल्या जाणाऱ्या सुशांतच्या स्वयंपाकीचीही सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे.

डीआरडीओच्या कार्यालयात आणि सांताक्रूझ येथील एअर फोर्सच्या गेस्ट हाऊसमध्ये सुशांत सिंहच्या स्टाफची चौकशी केली जात असताना सीबीआयची दुसरी टीम वांद्रे पोलीस स्थानकाजवळ असणाऱ्या पोलिस उपायुक्त कार्यालयात पोहोचली होती. सीबीआयच्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमधील फॉरेन्सिक एक्स्पर्ट सुशांतच्या घरी जाण्याची शक्यता आहे.

सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह इतरांविरुद्ध पाटणा येथे नोंदवण्यात आलेला प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) आणि त्याचा तपास सीबीआयला हस्तांतरित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मंजुरी दिली. मुक्त, सक्षम आणि निष्पक्ष तपास ही काळाची गरज असल्याचे नमूद करतानाच, हा तपास सीबीआयला सोपवण्यास मान्यता देण्यासाठी बिहार सरकार पात्र आहे, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.

बिहार पोलिसांनी सुशांतच्या मृत्युबाबत नोंदवलेला ‘एफआयआर’ योग्य आहे. सुशांत राजपूतच्या मृत्यूच्या संदर्भात आणखी एखादे प्रकरण दाखल करण्यात आले, तर सीबीआयच त्याचा तपास करेल असं न्यायालयाने सांगितलं आहे. या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या मुंबई पोलिसांची कार्यकक्षा मर्यादित आहे असंही न्यायालयाने म्हटलं होतं.