माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा फेरतपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्ली विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती सोमवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने शेट्टी यांचा भाऊ संदीप याची याचिका फेटाळून लावली.
शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला विरोध करत शेट्टी यांचा भाऊ संदीप याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. शेट्टी यांच्या हत्येमागील हेतू शोधण्यासाठी म्हैसकर यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीच्या फेरतपासाची मागणी सीबीआयने केली आणि न्यायालयाने प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले होते. असे असतानाही सीबीआय शेट्टी यांच्या हत्येचे प्रकरण बंद करण्याचा अहवाल कनिष्ठ न्यायालयात सादर कसा करू शकते, असा सवाल संदीप यांनी याचिकेद्वारे उपस्थित केला होता. शिवाय हा तपास करणाऱ्या पुणे येथील सीबीआयच्या अधिकाऱ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही संदीप यांनी केला होता.
शेट्टी यांच्या हत्येसंदर्भात तपासादरम्यान लोणावळा येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी जानेवारी २०१४ मध्ये २१ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये काही महत्त्वाची माहिती हाती लागल्याने शेट्टी यांच्या हत्येचा फेरतपास करण्यात येत असून तो  सीबीआयच्या दिल्ली विभागातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती सीबीआयच्या वतीने अ‍ॅड्. हितेन वेणेगावकर यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयाला दिली.