शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना आर्थिक क्षेत्राबाबत ज्ञान असावे, या हेतून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आयोजित केलेली ‘राष्ट्रीय आर्थिक साक्षरता चाचणी’ येत्या १२ जानेवारी रोजी होणार आहे.
सीबीएसई शाळांतील आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आर्थिक क्षेत्राशी संबंधित विषयांबाबत असलेल्या ज्ञानाचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सच्या (एनआयएसएम) सहकार्याने ही चाचणी परीक्षा भरवण्यात येणार आहे. ‘पैशाचे मोल जाणण्याबरोबरच जबाबदार आर्थिक निर्णय घेण्यासाठीचे योग्य ज्ञान आणि कौशल्य असलेला देश घडवण्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल आहे,’ असे सीबीएसईने आपल्या पत्रकात म्हटले आहे. ही परीक्षा हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत होणार असून वित्त आणि उद्योग क्षेत्रातील मुलभूत ज्ञानावर आधारीत ७५ प्रश्न यात विचारण्यात येणार आहेत.