जुलैमध्ये होणे अपेक्षित असलेल्या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) आणि आयसीएसई परीक्षा रद्द करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांचे त्यांच्या आधीच्या तीन परीक्षांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार आहे. दहावी, बारावीचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात येणार असल्याचेही सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

सीबीएसई आणि आयसीएसई या दोन्ही मंडळांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार होत्या. मात्र, मार्चमध्ये देशभरात टाळेबंदी लागू झाली. त्यानंतर या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. या परीक्षा जुलैमध्ये घेण्याचे या मंडळांनी मे महिन्यात जाहीर केले. मात्र, याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील सुनावणीदरम्यान परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

पुन्हा परीक्षा घ्यायच्या असल्यास त्याचा निर्णय केंद्रीय स्तरावरून घेणार की राज्यांनी त्यांच्याकडील परिस्थितीनुसार घ्यावा, असा प्रश्न उपस्थित करून परीक्षा आणि मूल्यमापन प्रणालीबाबत सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने सीबीएसईला दिले. त्यानुसार शुक्रवारी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या विधि अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, दिनेश माहेश्वरी, संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

निर्णय काय?

* विद्यार्थ्यांचे मूल्यांकन त्यांनी आधी दिलेल्या तीन परीक्षांच्या आधारे करण्यात येणार आहे.

* सीबीएसईच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परिस्थिती निवळल्यावर पुन्हा परीक्षेची संधी मिळणार आहे.

* सीबीएसईच्या दहावी आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार नाही.