केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आता सोपे होणार आहे. प्रत्येक विषयात अंतर्गत आणि बाह्य़ मूल्यमापन परीक्षेत स्वतंत्रपणे उत्तीर्ण होण्याची अट मंडळाने मागे घेतली असून विषयात एकूण ३३ टक्के गुणच आवश्यक असणार आहेत. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांत अकरावी प्रवेशासाठी राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांना तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून दहावीच्या वाढत्या निकालामुळे अकरावी प्रवेशाची स्पर्धा शिगेला पोहोचली आहे. त्यात यंदा अधिकच भर पडण्याची शक्यता आहे. मुळातच ९० टक्क्य़ांपेक्षा जास्त निकाल लागणाऱ्या सीबीएसईने यंदापासून उत्तीर्णतेचे निकष शिथिल केले आहेत. सीबीएसईच्या विद्यर्थ्यांना एखाद्या विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक असते. आतापर्यंत अंतर्गत मूल्यमापन आणि बाह्य़ मूल्यमापन म्हणजे मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेत स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण मिळाले तरीही विद्यर्थ्यांना लेखी परीक्षेतही ३३ टक्के गुण मिळवावे लागत. मात्र आता ही अट मंडळाने मागे घेतली आहे. येत्या म्हणजेच २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात शालास्तरावरील परीक्षा, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा मिळून ३३ टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे ठरणार आहेत.

सीबीएसईच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असला तरी राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांची चिंता मात्र वाढण्याची शक्यता आहे. सीबीएसई मधून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. सीबीएसईचा निकाल वाढण्याची शक्यता असून त्यामुळे अकरावी प्रवेशाची स्पर्धाही वाढणार आहे. त्याचप्रमाणे उत्तीर्णतेचे निकष आणि गुणदान पद्धतीतही तफावत आहे. राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांंना उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गुण मिळवावे लागतात.

अंतर्गत गुणांची खिरापत

सर्वच मंडळांच्या वाढत्या निकलांमागे शाळेच्या स्तरावर देण्यात येणारम्य़ा गुणांचा हातभार असल्याची टीका गेली काही वर्षे सातत्याने होत आहे. आतापर्यंत त्याला सीबीएसई काहीसे अपवाद होते. मात्र आता निकाल वाढण्यासाठी अंतर्गत गुणांची खिरापत वाटण्याचा पायंडा सीबीएसईतही पडणार असल्याचे दिसत आहे.