परीक्षा, निकाल सगळेच लांबल्यामुळे नवे शैक्षणिक वर्ष लांबणार आहे. त्यामुळे घटलेल्या अध्यापन कालावधीचा विचार करून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमाचा भार ३० टक्क्य़ांनी कमी केला आहे.

यंदा सीबीएसईचे एप्रिलमध्ये सुरू होणारे शैक्षणिक वर्ष अद्यापही सुरळीत सुरू झालेले नाही. ऑनलाइन अध्यापन सुरू झाले असले तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. दहावीचे निकालही अद्याप जाहीर न झाल्यामुळे अकरावीचे शैक्षणिक वर्ष सुरू झालेले नाही. या सर्व परिस्थितीत शैक्षणिक वर्षांतील नियोजित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. त्याअनुषंगाने सीबीएसईने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा भार ३० टक्क्य़ांनी कमी केला आहे.

वगळलेले घटक लेखी परीक्षाप्रमाणेच तोंडी परीक्षेसाठी किंवा अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य़ धरण्यात येणार नाहीत, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. आयसीएसईने यापूर्वीच अभ्यासक्रम कमी करण्याचे जाहीर केले आहे. राज्यमंडळानेही अभ्यासक्रम कमी करण्याचे जाहीर केले असून त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

झाले काय?

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अभ्यासक्रम कमी करण्याबाबत पालक, शिक्षकांची मते मागितली होती. त्यावर दीड हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला. आलेल्या प्रतिसादाचा आढावा घेऊन अभ्यासक्रम मंडळाने अभ्यासक्रमाची यंदासाठी फेररचना केली आहे. काही घटक कमी केले आहेत तर काही घटक विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी नेमून दिले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रत्येक इयत्तेनुसार शिकणे आवश्यक असलेल्या सर्व संकल्पना कायम ठेवून बदल करण्यात आले आहेत.