सीसीटीव्ही चित्रीकरण पालिकेच्या हाती

मुंबईमध्ये १ जुलै रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे सखल भाग जलमय झाले होते. मालाड पूर्व येथील आंबेडकर चौक आणि आसपासच्या परिसरातही प्रचंड पाणी साचले होते. त्याच वेळी आंबेडकर चौकातील ‘त्या’ गटारावरील झाकण एका व्यक्तीने काढल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणातून स्पष्ट झाले आहे.

झाकण काढल्यानंतर काही दिवस हे गटार प्लायवूडने झाकले होते. मात्र काही दिवसांनी प्लायवूड काढून टाकल्याने गटार उघडेच होते. त्यात पडलेला दिव्यांश बेपत्ताच आहे. दरम्यान, गटारावरील झाकण काढणारी व्यक्ती कोण याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

मालाड पूर्व येथील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौक परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात चिमुकला दिव्यांश पडला आणि आजतागायत त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये संताप आहे. अग्निशमन दल, पालिका अधिकाऱ्यांनी दिव्यांशचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दिव्यांशचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफलाही पाचारण करण्यात आले. मात्र दिव्यांशचा शोध लागला नाही. गटारावर ढापा नसल्यामुळे पालिका अडचणीत आली आहे.

दिव्यांश ज्या गटारात पडला त्यावर झाकण होते. मात्र १ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळू लागला आणि या परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले. पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी या गटारावरील झाकण एका व्यक्तीने १ जुलै रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास काढल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण पालिकेच्या हाती लागले आहे. झाकण काढणारी व्यक्ती मात्र त्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे पालिकेने या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

पाण्याचा झटपट निचरा व्हावा या उद्देशाने गटारावरील काढलेला ढापा पुन्हा लावण्यात आला नव्हता. काही दिवसांनी या गटारावर प्लायवूड टाकून ठेवण्यात आले होते असे सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रीकरणावरून उघड झाले आहे. मात्र प्लायवूड हटविल्याने ७ ते १० जुलै या कालावधीत गटार उघडेच होते हे चित्रीकरणावरून उघडकीस आले आहे. ढापा कुणी काढला, प्लायवूड कोणी ठेवले होते, त्यानंतर प्लायवूड कोणी काढले याची चौकशी पालिकेमार्फत सुरू आहे, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

कचरा फेकणाऱ्यांचीही चौकशी

‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत पालिकेने याच भागात स्वच्छता मोहीम राबविली होती. त्या वेळी या गटाराजवळच असलेल्या एका भंगारवाल्यावर अस्वच्छता केल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात कचरा टाकणाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता या अधिकाऱ्याने व्यक्त केली.