चर्चगेट ते डहाणू स्थानकापर्यंत ७० हून अधिक ठिकाणांची चाचपणी

उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फलाटांवर लावलेल्या सीसीटीव्हींची आवश्यक तेथे दिशा बदलून त्यांच्या साहाय्याने महिला डब्यांलगतचा फलाट टिपता येईल, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते डहाणू स्थानकांदरम्यानच्या ७० ठिकाणच्या कॅमेऱ्यांची दिशा यासाठी बदलण्यात येणार असून यासंबंधीचा प्रस्तावही रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे.

रेल्वे प्रवासात महिलांची छेडछाड, विनयभंग, चोरीच्या उद्देशाने मारहाण असे गुन्हे घडतात. या गुन्हय़ांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून अनेक उपाययोजनाही केल्या जात आहेत. सध्या पश्चिम रेल्वेतर्फे महिला प्रवाशांशी संवाद साधण्यात येत आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, विरार स्थानकात हा उपक्रम सुरू आहे. यात महिला डब्यात सुरक्षेवर अधिक भर देण्यात यावा आणि डब्यातील सीसीटीव्ही बसविण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जावे, अशा सूचनादेखील करण्यात आल्या होत्या.

या सूचना प्राप्त झाल्यानंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेत योग्य ते बदल करण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. पण तत्पूर्वी स्थानकातील सीसीटीव्हींचा आढावाही घेण्यात आला आहे. लोकल स्थानकात येताच महिला डबे प्राधान्याने सीसीटीव्हींच्या टप्प्यात येतात का, याची पाहणी रेल्वे सुरक्षा दलाकडून करण्यात आली आहे. यात काही सीसीटीव्हींच्या टप्प्यात महिलांचे डबे येत नसल्याचे निदर्शनास आले. अशी चर्चगेट ते डहाणूपर्यंत ७० हून अधिक ठिकाणे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार ७० हून अधिक ठिकाणांची सीसीटीव्हींची दिशा बदलून महिला डबे सीसीटीव्हींच्या कक्षेत आणले जाणार आहेत. याचा प्रस्ताव तयार करून मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.