मुंबईतील गुन्हेगारीवर सीसीटीव्ही बसविल्यावर अधिक प्रभावीपणे आळा बसणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निम्म्याहून कमी पोलीस दल लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हेगारी रोखली जाईल आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी पावले टाकली जातील. सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून आता तो ३८ टक्क्यांपर्यंत गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईसह राज्यातील गुन्हेगारी वाढत आहे आणि कायदा व सुव्यवस्था सुरळीत नसल्याची टीकाही सातत्याने होत आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेचा संपूर्ण विचार झाल्याखेरीज रात्रजीवनाला मंजुरी देण्यात येऊ नये, असा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे.
या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आणि अन्य बाबींवर मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. गुन्हेगारीला आळा घालणे आणि गुन्हेगारांवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे, या दोन्हींसाठी आधुनिक तंत्रज्ञानासह अन्य गोष्टींचा परिणामकारक वापर करण्यात येत आहे. मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. ते बसविले गेल्यावर गुन्हेगारांवर नजर राखली जाईल, त्यांचे चित्रीकरण होऊन पकडले जातील आणि गुन्हा शाबीत होण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. पोलीस दलात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यांच्यावर ताण आहे आणि आणखी कर्मचाऱ्यांची भरती करावी लागेल, याविषयी दुमत नाही. भरती केली जाईलच. पण कॅमेरे बसविल्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीचे पोलीस कर्मचारी निम्म्याने कमी लागतील, असे त्यांनी सांगितले.