क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी परिसरातील वाहतूक समस्येबाबत न्यायालयाचे आदेश

मुंबई : काळबादेवी तसेच क्रॉफर्ड मार्केट परिसरातील वाहतुकीची समस्या अद्यापही सुटलेली नाही. त्यामुळेच या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीररीत्या उभ्या केल्या जाणाऱ्या गाडय़ांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी वाहतूक पोलिसांना दिले. तसेच बाजार परिसरातील वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत असलेल्या अरूंद गल्ल्यांमधील बेकायदा फेरीवाल्यांवरही कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यावर देखरेख ठेवण्याकरिता सध्या नाकानाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीररीत्या उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी उपयोग करा, असे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने वाहतूक पोलिसांना दिले. त्यानंतर काळबादेवी, क्रॉर्फड मार्केट परिसरात लवकरच हा प्रयोग सुरू करू, अशी कबुली राज्य सरकारतर्फे न्यायालयाला देण्यात आली.

आधीच अरूंद असलेल्या काळबादेवी, क्रॉफर्ड मार्केटसारख्या बाजार परिसरांमध्ये हातगाडय़ा लावण्यास परवानगी कशी दिली जाते, अशा बेकायदेशीररीत्या हातगाडय़ा लावणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई का केली जात नाही? असा सवाल न्यायालयाने केला. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना दिले. त्यावर रस्त्याच्या एकाच बाजूला तारखेनुसार सम-विषम पद्धतीने वाहन उभे करण्याबाबतच्या नियमाची काटेकोर पालन केले जाईल, अशी हमीही पोलिसांनी न्यायालयाला दिली. व्यापारी संघटनेला विश्वासात घेऊन प्रायोगिक तत्त्वावर हा नियम राबवण्यात येत आहे.

दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे ही बाब राजकुमार शुक्ला यांनी जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.